स्मार्ट फोन करेल काय विद्यार्थ्यांच्या भविष्याचा ‘गेम’
ऑनलाईन अभ्यासाच्या नावावर नवी पिढी मोबाईल गेम्सच्या नादात !
विलास ताजने, वणी: ऑनलाईन अभ्यास करण्यासाठी बहुतांश पालकांनी मुलांना स्मार्ट फोन घेऊन दिले. मात्र विद्यार्थी ऑनलाईन अभ्यासात कमी आणि मोबाईल गेममध्ये अधिक वेळ गुंतून असल्याचे दिसून येत आहे. याचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांच्या मानसिक स्थितीवर होऊ शकतो. म्हणून पालकांनी वेळीच सावध होण्याची गरज निर्माण झाली आहे. या स्मार्ट फोन्सच्या दरुपयोगाने विद्यार्थ्यांच्याच भविष्याचा ‘गेम’ होईल काय अशी स्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे पालकांनी सावध होण्याची गरज आहे.
लॉकडाऊनमुळे शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून सर्व शाळांनी ऑनलाईन शिक्षणाचा मार्ग स्वीकारला. यासाठी आर्थिक परिस्थिती बेताची असताना अनेक गरीब पालकांनी शिक्षक आणि मुलांच्या हट्टापायी स्मार्ट मोबाईल घेऊन दिले. मात्र पालक आपापल्या कामात गुंतलेले असतात. परिणामी आपल्या मुली मुलांच्या अभ्यासाच्या वेळेत लक्ष केंद्रीत करू शकत नाहीत.
मुले सदानकदा मोबाईल घेऊन अभ्यास करीत असल्याचं पालकांना भासवितात. मुले अभ्यासात गुंग असताना ‘अरे हाण,’ ‘पाठलाग कर’, ‘उडव त्याला’, ‘जाऊ देऊ नको,’ असे बोलत असतील तर तो मोबाईलवर खेळ खेळण्याच्या नादाला लागल्याचे स्पष्ट होते. मुले ‘फ्री फायर’ ‘फौजी’ आदी गेम खेळत असतात.
मुलांच्या सतत मोबाईल गेम खेळण्याच्या व्यसनामुळे मुलांची मानसिक स्थिती कुठल्याही थराला जाऊ शकते. सतत खेळ खेळण्यामुळे एकटे राहणे, चिडचिड करणे, जोराने ओरडणे एवढेच नव्हे तर त्या खेळात असलेले हावभाव करणे आदी लक्षणे दिसून येतात. याशिवाय सातत्याने मोबाईलचा प्रकाश डोळ्यावर पडत असल्याने डोकेदुखी, डोळे कमजोर होणे आदी आजार होण्याची संभावना असते. प्रसंगी डोळ्यांची कार्यक्षमता कमी होऊन बालकांना अंधत्वही येऊ शकते. ऑनलाईन अभ्यासाच्या नावावर मुले नेमकं काय करतात. याकडे पालकांनी कटाक्षाने लक्ष देण्याची गरज आहे.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)