नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव येथील तहसिल कार्यालयातील सेतू सेवा केंद्रात आज शुक्रवारी दिनांक 18 सप्टेंबर रोजी सकाळी साप निघाल्याने एकच खळबळ उडाली. सापाची लांबी बघून अनेकांना घाम फुटला. अखेर या सापाला वणी येथील प्रसिद्ध सर्पमित्र हरीष कापसे यांनी पकडून जीवदान दिले.
मारेगाव येथील तहसिल कार्यालयात सेतू सेवा केंद्र आहे. आज सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास सेतू केंद्राचे कर्मचारी स्वप्नील सातपुते व आशिष पेचे हे नेहमी प्रमाणे तहसिल कार्यालयात पोहोचले. तिथे त्यांनी सेतू केंद्राच्या कार्यालयाचा दरवाजा उघडला. मात्र त्यांना समोर एक 6 फुटांचा साप दिसला. साप बघताच त्यांचा थरकाप उडाला. ते लगेच घाबरून सेतू केंद्राचे बाहेर आले.
सेतू केंद्राच्या कर्मचा-यांनी तात्काळ याची माहिती मोबाईलवरून वणी येथील प्रसिद्ध सर्पमित्र हरिष कापसे यांना दिली. अवघ्या 20-25 मिनिटात हरिष कापसे हे वणी वरून मारेगावला पोहचले. त्यांनी लगेच अवघ्या दोन मिनिटांत सापाला पकडले व त्याला जंगल परिसरात सोडून जीवदान दिले.
सदर साप हा धामण जातीचा असून हा साप बिनविषारी आहे. सापाला न मारता सेतू केंद्राच्या कर्मचा-यांनी याची माहिती सर्पमित्राला दिली याबाबत त्यांचे कौतुक होत आहे.
आतापर्यंत 2 हजार सापांना जीवदान
वणी येथील रहिवाशी असलेले सर्पमित्र हरिष कापसे हे गेल्या 10 ते 12 वर्षांपासून सर्पमित्र म्हणून परिसरात काम करीत आहे. नाग (कोब्रा), रसेल वायफर (घोणस), मन्याळ, फुरशे अशा विषारी तर कवळ्या, धूळ नागीण, तस्कर, कुफरी, दिवड, अजगर, ढोरक्या, धामण या बिनविषारी सुमारे 2 हजारांपेक्षा अधिक सापांना पकडून जीवदान दिले आहे. हरिष हे साप पकडण्यासाठी कोणतेही शुल्क घेत नाहीत. परिसरात साप आढळल्यास त्याला न मारता सर्पमित्राला संपर्क करा असे आवाहन त्यांनी केले.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)