अभ्यास करण्यासाठी नगरपंचायतच्या नवीन इमारतीत जागा द्या
स्वामी विवेकानंद अभ्यासिकेतील विद्यार्थ्याची आमदारा कडे धाव
तालुका प्रतिनिधी, मारेगाव: गेल्या चार वर्षापासून येथील नगरपंचायतीच्या जुन्या इमारतीत तालुक्यातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांची अभ्यासिका तत्कालीन तहसीलदार येवलीकर यांच्या प्रयत्नातून चालू आहे. मात्र आता त्या ठिकाणी काही दिवसात नवीन इमारत बनत असल्याचे संकेत आहे.
त्यामुळे या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाने कायमस्वरूपी जागा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी स्वामी विवेकानंद अभ्यासिकेच्या विद्यार्थ्यांनी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना निवेदनातून केली आहे.
स्वामी विवेकानंद अभ्यासिकेच्या माध्यमातून तालुक्यातील २२ गरीब कुटुंबातील विद्यार्थी शासकीय सेवेत रूजू झाले. या अभ्यासिकेला उभारण्यासाठी अनेकांनी हातभार लावला.
तत्कालीन तहसीलदार येवलीकर यांनी ग्रामपंचायत इमारतीत ही अभ्यासिका विना भाडेतत्वावर विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन दिली. तसेच शासकीय सेवेत असलेले कपिल श्रृंगारे, प्रवीण खंडाळकर व गजानन नरवाडे यांनी नि:शुल्क शिकवणी देऊन मारेगावसारख्या आदिवासीबहुल तालुक्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची फौज निर्माण केली.
त्या शहरातील अनेक नागरिकांनी पुस्तके व इतर साहित्याची मदत केली. संभाजी ब्रिगेड या संघटनेनेसुध्दा मदत करुन सामाजिक दायित्व पार पाडले. अशा होतकरू व गरीब विद्यार्थांना नगरपंचायतची नवीन इमारत झाल्यावर कायमस्वरूपी अभ्यास करण्यासाठी जागा उपलब्ध व्हावी म्हणून विद्यार्थ्यांनी आमदार यांच्या कडे निवेदनातून मागणी केली.