जितेंद्र कोठारी, वणी: अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना आज वणी उपविभागाच्या निरीक्षण दौऱ्यावर आले. उपविभागातील सर्व पाचही ठाण्याचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी सकाळी 10.30 वाजता दरम्यान विशेष पोलीस महानिरीक्षक यांचा ताफा वणीत दाखल झाला. यवतमाल जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटीलही त्यांच्यासह वणीत आले आहे.
विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती परिक्षेत्राचे पदभार स्वीकारल्यानंतर चंद्रकिशोर मीना हे पहिल्यांदा वणी येथे आले आहे. वणी पोलीस स्टेशन यवतमाळ जिल्ह्यातील महत्वाचे आणि वजनदार पोलीस ठाणे म्हणून ओळखले जाते. वणी उपविभाग अंतर्गत वणी, शिरपूर, मारेगाव, मुकूटबन व पाटण असे पाच ठाण्याचा समावेश आहे. वणी आणि मुकूटबन हे दोन ठाणे पोलीस निरीक्षक दर्जाचे तर पाटण, शिरपूर व मारेगाव पोलीस स्टेशन सहा.पोलीस निरीक्षक दर्ज्याचे आहेत.
उपविभागातील पाचही पोलीस स्टेशन अंतर्गत क्राईम रेकॉर्ड, डिटेक्शन, मुद्देमाल जप्ती, प्रलंबित गुन्हे, अवैध व्यवसाय, सराईत गुन्हेगार, वाहतूक व्यवस्था व इतर बाबींचा वार्षिक आढावा विशेष पोलीस महानिरीक्षक घेणार आहे. शिवाय पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची समस्याही विशेष पोलीस महानिरीक्षक जाणून घेणार आहे. वणी येथे पोलीस वसाहतीचे प्रश्न मागील अनेक वर्षांपासून रखडलेले आहे.
वणी आणि शिरपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोळसा चोरी, रेतीची अवैध वाहतूक, चंद्रपूर जिल्ह्यात दारु तस्करी, गौवंश तस्करी, मटका, क्रिकेटवर सट्टा, अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात फोफावलेली आहे. मागील काही दिवसांपासून वणी व शिरपूर पोलिसांनी अवैध धंद्याविरुद्द कारवाईचा सपाटा लावला आहे. मात्र राजकीय पाठबळच्या जोरावर काही मंडळी कोळसा, रेती व दारू तस्करीचा व्यवसाय बिनधास्त करीत असल्याचे दिसत आहे. आपल्या निरीक्षण दौऱ्यात विशेष पोलीस महानिरीक्षक याकडे लक्ष देतील काय ?
हे देखील वाचा: