जितेंद्र कोठारी, वणी: यवतमाळ येथे नुकतेच जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडास्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवसीय स्पर्धेत श्री रामदेव बाबा मूकबधीर मतिमंद कर्मशाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. दरवर्षी प्रमाणे यावर्षीदेखील ही शाळा जिल्ह्यातून प्रथम आली आहे.
50, 100, 400 मीटर धावणे, लांब उडी, गोळा फेक, स्पॉट जम्प आदी विविध क्रीडास्पर्धा झाल्यात. वेगवेळ्या वयोगटांत व प्रवर्गात मूकबधीर, गतिमंद कर्मशाळेतील अनिता आत्राम, दीपक मेश्राम, पूजा कोडपे, दिव्या मडावी, सुजन कांबळे, श्रवण उपरे, कामाक्षी चोपणे या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकविले. सिमरन कश्यप, दीप खोब्रागडे, वेदिका भोयर, चेतन सोनटक्के, समीर आत्राम, महादेव भोयर, किरण पंधरे या विद्यार्थ्यांनी द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त केले.
प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांची निवड राज्यस्तरीय स्पर्धेकरिता झाली आहे. क्रीडास्पर्धेनंतर आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत द्वितीय स्थान प्राप्त केले. शाळेच्या मुख्याध्यापिका सरोज जैन, शिक्षकगण चित्रलेखा लारोकर, भारती हिवरे, प्रतिभा मोहुर्ले तसेच कर्मचारी महेश करलुके, अजय गिरी, सुरेश मरकड, अनू गोंडे, नीलिमा गुरनुले यांनी विद्यार्थ्यांवर विशेष परिश्रम घेतले. पुढे होणारे राज्यस्तरीय स्पर्धांसाठी संस्थेचे अध्यक्ष दलितमित्र मेघराज भंडारी यांनी शुभेच्छा दिल्यात.
विशेष म्हणजे दिव्यांग क्रीडा स्पर्धा 2019 मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून यवतमाळ जिल्ह्याला द्वितीय पुरस्कार प्राप्त झाला होता. त्यामध्ये सुध्दा श्री रामदेव बाबा अपंग मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रदर्शन केले होते.
Comments are closed.