शिवसेना वणी म्हणतेय, ‘आता तरी हा खेळखंडोबा थांबवा!’

रिक्त तालुका क्रीडा अधिकारी पद त्वरीत भरण्याची मागणी

0

बहुगुणी डेस्क, वणीः वणी शहरातील क्रीडाप्रेमींचा ‘खेळखंडोबा’ थांबवा. रिक्त तालुका क्रीडा अधिकारी पद त्वरीत भरा अषी मागणी वणी शिवसेनेने केली आहे. शिवसेनेचे वणी शहरप्रमुख राजू तुराणकर, शिवसेनेचे नेते दीपक कोकास, गणपत लेडांगे, संजय निखाडे, राजू देवडे, अजिंक्य शेंडेे यांनी तहसिलदारांना या संदर्भात निवेदन सादर केले.

तालुका क्रीडा अधिकारी हे पद काही वर्षांपासून रिक्त आहे. त्यामुळे तालुका क्रीडा विभागाचा कारभार हा अनियंत्रित सुरू आहे. वणी विभागातील क्रीडा क्षेत्रांतील युवकांची विविध कारणांसाठी त्यामुळे प्रचंड गैरसोय होते. एकीकडे सर्व क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन द्यावे असे बोलले जाते. तर दुसरीकडे त्यांना पुरेसे क्रीडासाहित्य अथवा मार्गदर्शन मिळत नाही.

वणी शहरात अनेक क्रीडापटू आपापल्या परीने सराव करीत आहेत. काही सिनिअर्स हे स्वेच्छेने त्यांना मार्गदर्शन करीत आहेत. वणीला प्रभारी क्रीडा अधिकारी नियुक्त न करता कायमस्वरूपी क्रीडा अधिकारी नियुक्त करावा असा आग्रह शिवसेनेने धरला आहे.

शहरात अनेक क्रीडापटू हे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरांवर खेळले आहेत. अनेक प्रतिभासंपन्न क्रीडापटूंची एक उत्कृष्ट फळी वणीत निर्माण झाली आहे. त्यांच्या क्रीडाप्रतिभेला न्याय मिळाला पाहिजे. अनेक मुली व महिला क्रीडापटूंचीदेखील गैरसोय होते. त्यासाठी शहरात क्रीडाभवनाचे कामदेखील तात्काळ सुरू झाले पाहिजे. तसेच क्रीडाप्रेमींची व क्रीडापटूंची होणारी गैरसोय त्वरीत थांबविली पाहिजे अशी मागणी शिवसेनेचे वणी शहरप्रमुख राजू तुराणकर आणि पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना एका निवेदनातून केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.