…. आणि एसटी कर्मचा-याची पत्नी पोहोचली कीटकनाशकाची पुडी घेऊन

बस स्टँड परिसरात उपोषणस्थळी उडाली एकच खळबळ

विवेक तोटेवार, वणी: आज सोमवारी एसटी कर्मचा-यांचा संप सुरू असलेल्या ठिकाणी एका कर्मचा-याची पत्नी तिच्या मुलासह विषाची पुडी घेऊन पोहोचली. त्यामुळे उपोषण स्थळी काही काळ एकच खळबळ उडाली. मात्र प्रसंगवधान लक्षात घेऊन संपकरी कर्मचा-यांनी महिलेकडून कीटकनाशकाची पुडी हिसकवल्याने कोणतीही अनुचित घडना घडली नाही. 

एसटीचे राज्य शासनात विलिनीकरण करावे यासाठी गेल्या 5 नोव्हेंबरपासून वणीत एसटीचे कर्मचारी संपावर आहे. अलीकडेच दोन बसवर झालेल्या दगडफेकीमुळे चर्चेत आलेल्या वणीतील संपादरम्यान आज दुपारी 1 वाजताच्या दरम्यान एका घटनेचे चांगलीच खळबळ उडाली. वणी आगारात वाहतूक नियंत्रक पदावर असलेल्या अनिल कपिले यांच्या पत्नी अर्चना या त्यांच्या मुलासह यवतमाळ हून वणी येथे आल्या. दुपारी 1 वाजताच्या सुमारास त्या उपोषण मंडपात पोहोचल्या. त्यांनी सोबत किटकनाशकाची पुडी आणली होती. आपल्या पतीला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्रास होत असल्याचा आरोप करत त्यांनी आत्महत्या करण्याचा इशारा दिला.

महिला कर्माचा-याच्या टाहोने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान संपकरी कर्मचा-यांनी महिलेची समजूत काढली व कीटकनाशकाची पुडी हिसकावून घेतली. त्यानंतर ही प्रकरण शांत झाले. काही वेळातच घटनास्थळी पोलीस देखील पोहोचले होते. दरम्यान आधीच अनेक एसटी कर्मचा-यांना जीव गमवावा लागल्याने असे पाऊल कुणीही उचलू नये व शिस्तीत आंदोलन सुरू राहणार अशी प्रतिक्रीया संपकरी कर्मचारी मिलिंद गायकवाड यांनी दिली.

अनिल कपिले हे यवतमाळ येथे कुटुंबासह राहत असून त्यांना वणीमध्ये वाहतूक नियंत्रक या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. मात्र त्यानंतर संप सूरू झाला. ते संपात सहभागी असल्याने त्यांना कर्तव्यावर रूजू होण्यासाठी अधिकारी दबाव आणत असल्याचा आरोप अनिल यांच्या पत्नीने केला आहे.

Comments are closed.