टिळक चौकात उभारणार स्तंभ, तक्रार दाखल

खड्डा खणल्याने अपघाताची शक्यता

0

विवेक तोटेवार, वणी: वणी शहरातील सर्वात महत्वाच्या व रहदारीचा चौक म्हणून ओळखल्या जाणा-या टिळक चौकात स्तंभ उभारणार येण्यात असल्याची माहिती समोर येत आहे. त्या दृष्टीने पावलं उचलत नगर पालिकेने तिथे एक मोठा खड्डा ही खणला आहे. मात्र या चौकात आधीच जागा कमी असल्याने तिथे कोणतीही वास्तू उभारू नये, तसेच वास्तू उभारल्यास रहदारीचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो यासाठी वणीतील काही नागरिकांनी एसडीओ व मुख्याधिकारींना निवेदन सादर केले आहे.

वणीतील मध्यभागी असलेला तसेच रहदारीचा चौक म्हणून टिळक चौकाची ओळख आहे. तिथे आता नगर पालिकेने खड्डा खणला आहे. खड्डा खणलेल्या जागी आधी लोकमान्य टिळकांचा पुतळा होता. रहदारीच्या कारणावरून टिळकांचा पुतळा हटविण्यात आला व बाजूला नवीन पुतळा बसवण्यात आला. आता त्याच ठिकाणी एक स्तंभ उभारण्यात येणार आहे. याबाबत नगर परिषद मुख्याधिकारी यांच्याकडून नाहरकत घेण्यात आली आहे. ही माहिती काही सुजाण नागरिकांना मिळताच त्यांनी याचा विरोध केला व सदर काम रोखण्याबाबत निवेदन दिले आहे.

याबाबत काही नागरिकांनी मुख्याधिकारी यांची भेट घेतली असता या ठिकाणी आधी टिळकांचा पुतळा असल्याची माहिती नसल्याची कबुली दिली व सुरू असलेले काम लवकरात लवकर थांबवण्यात येईल असे आश्वासन दिले.

रहदारीच्या कारणामुळे इथे असलेला टिळकांचा पुतळा काही वर्षांआधी हटवण्यात आला होता. जर रहदारीच्या कारणावरून पुतळा हटवण्यात आला तर आता तिथे स्तंभ उभारल्यास रहदारीचा प्रश्न उपस्थित होणार नाही का? असा प्रश्न तक्रारकर्त्यांनी उपस्थित केला आहे. स्तंभासाठी सदर ठिकाणी मोठा खड्डा खणण्यात आला आहे. मात्र सध्या काम बंद आहे. परंतु खड्डा बुजवीण्यात न आल्याने या ठिकाणी अपघाताची दाट शक्यता आहे. आता याबाबत नगर परिषद मुख्याधिकारी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.