राज्यातील पोलीस दलातील बदल्यांना पुन्हा मुदतवाढ !
महाराष्ट्र शासनाच्या उपसचिवांच्या सहीने निघालेत आदेश
जब्बार चीनी,वणी: राज्यातील पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना पुन्हा मुदतवाढ देण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला. शासनाच्या निर्णयानुसार 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी राज्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना 5 सप्टेंबर ही मुदत देण्यात आली होती. महाराष्ट्र शासनाचे उपसचिव कैलास गायकवाड यांच्या सहीने हे आदेश काढण्यात आलेत.
राज्य शासनाने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना 5 सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली होती. आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही मुदत पुन्हा वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता 30 सप्टेंबरपर्यंत पोलिसांच्या बदल्या होणार नाहीत हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदांच्या बदल्या पुन्हा रखडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून महाविकास आघाडीतील मतभेत संपुष्टात आल्यानंतर बुधवारी आणि गुरुवारी राज्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. राज्यातील अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यानंतर इतर अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांकडे लक्ष लागले होते. शासनाने पत्रक काढून राज्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या बदल्या करण्यास 30 सप्टेंबर 2020 पर्यंतची मुदतवाढ दिली आहे.