‘वणी बहुगुणी’च्या बातमीमुळे मिळाली चोरीला गेलेली दुचाकी

जितेंद्र कोठारी, वणी: एकदा दुचाकी चोरीला गेली की ती परत मिळणे जवळपास अशक्य असते. मात्र एका सुजान वाचकामुळे दुचाकी मालकाला त्याची चोरीला गेलेली दुचाकी अवघ्या दोन दिवसात परत मिळाली. शहरातील जैन ले आऊट येथे 21 ऑगस्टच्या रात्री मोपेड चोरीची घटना घडली होती. याबाबत ‘वणी बहुगुणी’ने वृत्त प्रकाशित केले होते. सदर बातमी वाचून एका सजक वाचकाने या दुचाकीबाबत ‘वणी बहुगुणी’ला माहिती दिली व दुचाकी मालकाला त्याची दुचाकी परत मिळाली. अजय काटवले रा. जैन ले आऊट असे या सजग वाचकाचे नाव आहे.

सविस्तर वृत्त असे की अमन आनंद अंदेवार (32) हे जैन ले आऊट येथील रहिवासी आहे. त्यांच्याकडे काळया रंगाची ॲक्टिवा मोपेड (MH34 BU0343) सोमवारी दिनांक 21 ऑगस्टच्या रात्री त्यांनी नेहमीप्रमाणे त्यांची मोपेड घराबाहेर ठेवली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पाहिले असता त्यांना त्यांची दुचाकी तिथे नसल्याचे आढळून आले.

त्यांनी काही ठिकाणी शोध घेतला. मात्र मोपेडचा शोध न लागल्याने अखेर त्यांनी वणी पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी त्यांची ॲक्टिवा (किंमत 30 हजार) अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची तक्रार नोंदवली. ‘वणीतील दुचाकी चोरीचे सत्र थांबता थांबेना !’ या हेडिंगखाली वणी बहुगुणीने बुधवारी दिनांक 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळच्या सुमारास वृत्त प्रकाशित केले होते.

जैन ले आऊट येथील रहिवासी असलेले वणी बहुगुणीचे सुजाण वाचक अजय काटवले यांनी सदर बातमी वाचली. त्यांच्या घराजवळील एका गल्लीत सदर वर्णनाची मोपेड बेवारस अवस्थेत असल्याचे लक्षात आले. त्यांनी मोपेडचा नंबर चेक केला असता चोरी गेलेली मोपेड व त्यांच्याघराजवळ बेवारस असलेल्या मोपेडचा क्रमांक एकच असल्याचे आढळले.

अजय काटवले यांनी ‘वणी बहुगुणी’ला तात्काळ फोन करून सदर ॲक्टीवा मोपेड जैन कॉलोनी मध्ये शीतला माता मंदिर परिसरात बेवारस उभी असल्याची माहिती दिली. माहितीवरून ‘वणी बहुगुणी’ने अक्टिवा मालक अमन अंदेवार यांना कॉल करून कळविले. त्यांनी शीतलामाता मंदिराजवळ जाऊन बघितले असता सदर मोपेड त्यांचीच असल्याची खात्री पटली. ‘वणी बहुगुणी’च्या बातमीमुळे चोरी गेलेली दुचाकी मिळाल्याने दुचाकी मालक अमन अंदेवार यांनी ‘वणी बहुगुणी’चे आभार मानले.

‘वणी बहुगुणी’त प्रकाशित झालेली हिच ती बातमी…

पेट्रोल संपल्याने दुचाकी उभी?
सध्या शहरात दुचाकी चोरट्यांचा सुळसुळाट आहे. चोरीला गेलेली दुचाकी फार क्वचित वेळा परत मिळते. डुप्लिकेट चावीने किंवा दुचाकी डायरेक्ट करून चोरटे दुचाकी चोरतात. मात्र अनेकदा दुचाकीमध्ये पेट्रोल नसते. अशा वेळी चोरटे दुचाकी ज्या ठिकाणी बंद झाली त्या ठिकाणी दुचाकी ठेवून पसार होतात. या प्रकरणातही पेट्रोल संपल्याने किंवा दुचाकी बंद झाल्याने चोरटा दुचाकी बेवारस अवस्थेत ठेवून पसार झाल्याचा अंदाज व्यक्त होतोय.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.