अखेर नांदेपेरामार्गे जड वाहतुक बंद करण्याचे आदेश
कोळशाची वाहतूक खैरी, वडकी, करंजी, मारेगाव मार्गे वळविली.... नांदेपेरा, वांजरी, वनोजा येथील ग्रामस्थांचा लढा यशस्वी
जितेंद्र कोठारी, वणी : खैरी, मार्डी, नांदेपेरा, वांजरी, वणीमार्गे कोलवॉशरीमध्ये जाणारी कोळशाची जडवाहतुक बुधवार 12 ऑक्टो. पासून बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी दिले आहे. वरोरा तालुक्यातील एकोणा कोळसा खाणीतून होणारी कोळशाची वाहतूक आता खैरी, वडकी, करंजी, मारेगाव ते वणी अशी वळविण्यात आली आहे. ओव्हरलोड व जड वाहतुकीमुळे वणी नांदेपेरा मार्गाची अत्यंत दुरवस्था व अपघाताचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे नांदेपेरा, वांजरी, मजरा येथील ग्रामस्थांना अनेकदा प्रशासनाला निवेदने व 10 ऑक्टो.ला रस्ता रोको आंदोलन केले होते.
मार्डी, नांदेपेरा, वणी रस्ता 3.70 मीटर रुंदीचा असुन रस्त्याची भारवहन क्षमता 8 टन एवढी आहे. परंतु या मार्गावर एकोणा कोळसा खाणीतून 25 ते 30 टन कोळसा वाहतूक होत असल्यामुळे रस्ता पूर्णपणे तुटला. शिवाय भरधाव ओव्हरलोड वाहतुकीमुळे या मार्गावर अनेक अपघात घडले. नांदेपेरामार्गे कोळसा वाहतूक बंद करण्यासाठी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधीकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग व परिवहन विभागाला अनेकदा निवेदने देऊन विनंती केली होती.
10 ऑक्टो. रोजी नांदेपेरा येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यानंतर उपविभागीय अधिकारी कार्यालय वणी, सार्वजनिक बांधकाम विभाग व वाहतूक उपशाखा वणी यांनी दिलेल्या प्रत्यक्षदर्शी अभिप्रायचे अवलोकन करून जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी 12 ऑक्टो. पासून सदर कोळसा वाहतूक खैरी, वडकी, करंजी, मारेगाव मार्गे वळविण्याचे आदेश दिले. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या ट्रक चालकावर महाराष्ट्र मुंबई कायदा 1951चे कलम 131 अन्वये कारवाईचे आदेशही देण्यात आले आहे. एकुणच नांदेपेरा मार्गे अवजड वाहतूक बंद करण्याकरिता ग्रामस्थांनी केलेल्या आंदोलनाला यश मिळाले आहे.
Comments are closed.