वणी तालुक्यातील ग्रामीण डाक सेवकांचा बेमुदत संप सुरू

डाक वितरण, बचत सेवा, आरडी इ. सेवा होणार प्रभावीत

विवेक तोटेवार, वणी: ग्रामीण डाक विभागात सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी बुधवारी दिनांक 12 डिसेंबर पासून बेमुदत संप पुकारला आहे. वणीतील टिळक चौकातील मुख्य डाक घरासमोर डाकसेवकांचे कामबंद आंदोलन सुरू आहे. यात वणी तालुक्यातील ग्रामीण भागातील डाक सेवक सहभागी झाले आहे. संपूर्ण भारतात डाकसेवकांनी आपल्या मागण्यांसाठी 4 ऑक्टोबर 2023 रोजी एक दिवसाचा संप केला होता. परंतु सरकारने मागण्या मान्य न केल्याने 12 डिसेंबर पासून डाकसेवकांनी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे. या काम बंद मुळे ग्रामीण भागातील डाकसेवा प्रभावित होऊ शकते.

वणी तालुक्यात डाक सेवकांची संख्या ही सुमारे 270 आहे. डाकसेवकांकडे डाक वितरण, बचत सेवा, आरडी, बँकिंग सेवा, विमा, आयपीपीबी, किसान विकास योजना इत्यादी सेवा पुरवण्याचे काम असते. डाकसेवकांची रोज चार तासांचे काम असते. या कामासाठी कर्मचा-यांना 14 ते 15 हजार मासिक मानधन दिले जाते. डाकसेवकांना आठ तासाचे काम देऊन त्यांना नियमित कर्मचारी करावी ही डाकसेवकांची प्रमुख मागणी आहे.

तसेच 12-24-36 चे प्रमोशन, 5 लाख ग्रॅज्युईटी, 5 लाख ग्रुप विमा, ग्रामीण डाक सेवकांच्या कुटुंबीयांना मेडिकल सुविधा, कामामध्ये टार्गेट सिस्टमची सक्ती कमी करावी. कमिशन सिस्टीम बंद करावी, विभागीय कर्मचाऱ्यांप्रमाणे पगारी रजा, घरभाडे भत्ता, टीए, डीए, पेंशन, मेडिकल सुविधा, शिक्षण भत्ता इत्यादी मागण्या आहेत.

डाक सेवक संपावर गेल्यामुळे ग्रामीण भागातील बचत खाते भरणा, स्पीड बुकिंग वाटप, मुलाखत पत्र, मनीऑर्डर सेवा, रजिस्ट्री पत्र, आरडी, वीज बिल भरणा, सुकन्या योजनेचे कामांवर याचा परिणाम होऊ शकतो.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.