वणीत एसटीच्या सोमवारी 3 तर मंगळवारी 7 फे-या

कर्मचारी रुजू होताच फे-यांच्या संख्येत होणार वाढ

पुरुषोत्तम नवघरे, वणी: संपा दरम्यान फेरीसाठी निघालेल्या एका बसवर दगडफेक झाल्याने लालपरीची चाके पुन्हा थांबली होती. मात्र तब्बल एक आठवड्यानंतर पुन्हा लालपरीची चाके धावायला सुरूवात झाली आहे. सोमवारी वणी डेपोतून 3 बसेस तर मंगळवारी 7 बसेस निघाल्या. कर्मचारी येताच फे-या वाढणार अशी माहिती मिळाली आहे. दरम्यान संपकरी कर्मचा-यांचा पगार झाला असून यात 376 रुपये पगार जमा झाल्याची माहिती मिळाली आहे.

महाराष्ट्रात मागील सव्वा महिन्यांपासून एस टी महामंडळ कामगार संघटनेच्या वतीने संप पुकारण्यात आला आहे. महामंडळाच्या वतीने काही मागण्या पूर्ण करत पगार वाढ दिली. मात्र कर्मचारी विलीनीकरणाची मागणी घेऊन अजूनही संपावर आहे. या आधी दिनांक 30 नोव्हेंबर ला कर्मचा-याच्या विरोध डावलून अखेर तब्बल 27 दिवसानंतर वणी आगारातून स. 10.20 मिनिटांनी लालपरी धावली. वणी आगाराची चंद्रपूर-यवतमाळ अशी ही बस होती. बसमध्ये 10 प्रवासी होते. त्या दिवशी वणी आगारातून 2 बस धावल्या.

दरम्यान संपकरी कर्मचा-यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी करत संपातून बाहेर निघणा-या कर्मचा-यांचा निषेध नोंदवला होता. पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र त्यातील 1 बस वर परतीला दगडफेक झाली झाली होती. तेव्हा पासून बस फेऱ्या बंद झाल्या होत्या. दिनांक 6 डिसेंबर ला 3 बस वणी आगारातून निघाल्या. यातील 2 बस या वणी – पांढरकवडा व 1 बस वणी – मुकुटबन अशी होती. तर दिनांक 7 डिसेंबर ला त्यात वाढ होऊन एकूण 7 बस निघाल्या यात वणी-घुग्गुस-चंद्रपूर 3 बस, वणी -पाटण – मुकुटबन 2 बस आणि वणी – पांढरकवडा अशा 2 निघाल्या आणि सुखरूप परत आल्या. आज पर्यंत एकूण 24 कर्मचारी कामावर आल्याची माहिती आगरप्रमुख यांनी दिली. प्रवाशांची संख्या मात्र कमी होती. तर संपकरी कर्मचा-यांमध्ये फूट पडल्याचे दिसून येत आहे.

कर्मचारी वाढताच बस फे-या वाढणार
वणी आगारात एकूण बस संख्या 40 आहेत. तर एकूण कर्मचारी 228 आहेत. यातील 24 कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. यात चालक, वाहक, तंत्रज्ञ इत्यादींचा समावेश आहे. आणखी चालक-वाहक सुरू झाल्यावर बस फे-यांची संख्या वाढणार अशी माहिती आगार प्रमुखांनी दिली. संपामुळे वणी आगाराचे रोजचे 5 लाखांचे नुकसान होत आहे.

संपकरी कर्मचा-या मिळाला 376 रुपये पगार
शासनाने विलिनीकरणाची मागणी धुडकावून पगारवाढ केली. मात्र जे लोक रुजू होतील त्यांनाच पगार मिळणार अशी भूमिका शासनाने घेतली. कोरोनामुळे कर्मचा-यांचे अनियमीत पगार होत होते. कर्मचा-याची दर महिन्याच्या 7 तारखेला पगार व्हावा अशी देखील एक मागणी होती. त्यानुसार काही कर्मचा-याचा पगार अकाउंट मध्ये जमा झाला आहे. त्यात एका कर्मचा-याचा पगार 376 रुपये आला. चहापाण्याची सोय झाली अशी प्रतिक्रिया सदर कर्मचा-याने दिली.

एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण व्हावे या मागणीसाठी दिनांक 29 ऑक्टोबर पासून राज्यातील एसटी महामंडळाच्या कर्मचा-यांनी संप पुकारला होता. वणीतील आगारात दिनांक 4 नोव्हेंबरपासून सुमारे 250 कर्मचा-यांनी काम बंद आंदोलन सुरू केले होते. तेव्हापासून वणी आगारातून एकही बस धावली नाही. शासनाने पगारवाढ करून कर्मचा-यांना रुजू होण्याचे आदेश दिले आहे. मात्र याला अद्यापही कामगारांचा विरोध असून कामगारांचा संप सूरुच आहे. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.