पिंपरीच्या विद्यार्थ्यांना चिखल तुडवीत गाठावी लागते शाळा
पक्का रस्ता नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल
तालुका प्रतिनिधी, वणी: तालुक्यातील पिंपरी (कायर) येथील विद्यार्थ्यांना लगतच्या वेळाबाई येथे माध्यमिक शिक्षणासाठी येजा करावी लागते. पावसाळ्यात तर पक्क्या रस्त्याअभावी अक्षरशः विद्यार्थ्यांचे हाल होतात. वारंवार मागणी करूनही पक्का रस्ता निर्माण करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी काळातही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे बेहाल होत असल्याचं चित्र दिसून येते.
वणी तालुक्यातील पिंपरी (कायर) येथे जिल्हा परिषदेचे एक ते सातवी पर्यंत वर्ग आहे. पुढील शिक्षणासाठी विद्यार्थी चार किलोमीटर अंतरावर असलेल्या वेळाबाई येथे जातात. पावसाळ्यात सदर पांदण रस्त्याने नाईलाजाने विद्यार्थ्यांना येजा करावी लागते. चिखलामुळे चार किलोमीटरचे अंतर पायदळ गाठण्यासाठी चिमुरड्यांना एक तासाचा अवधी लागतो. शाळेत पोहचण्यासाठी विलंब होतो. यामुळे विद्यार्थ्यांची प्रार्थना किंवा पहिल्या तासिकेला गैरहजेरी लागते. प्रसंगी विद्यार्थ्यांना शिक्षकांचे बोलणे ऐकावे लागतात. प्रारंभीच्या तासिकेला विद्यार्थ्यांना मुकावे लागते. त्यामुळे शैक्षणिक नुकसान होते.
दररोज शारीरिक क्षमतेपेक्षा अधिक पायदळ चालणे होत असल्याने विद्यार्थी आजारांना बळी पडतात. यामुळे चिमुरड्यांचे शारीरिक स्वास्थ धोक्यात येते आहे. परिणामी भावी पिढीचे भविष्य अंधःकारमय होत आहेत.
एकीकडे शहरात वेगवान प्रवासासाठी गरज नसतानाही मेट्रोची उभारणी सुरू आहे. मात्र, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत येजा करण्यासाठी साधा पक्का रस्ताही नशिबी नाही. ही केवढी मोठी शोकांतिका आहे.
रस्ता निर्मितीसाठी पाठपुरावा सुरू: माजी सरपंच
‘पिंपरी ते वेळाबाई हा 3 किमी अंतराचा पूर्वीचा पांदण रस्ता आहे. सदर पांदण रस्त्याला ग्रामीण मार्गाचा दर्जा मिळण्याबाबत फेब्रुवारी 2018 ला उपअभियंता जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग, वणी यांच्याकडे प्रस्ताव सादर केला. ई- क्लास जमिनीतून रस्ता निर्माण करण्यासाठी वेळाबाई ग्रामपंचायतचे नाहरकत प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. रस्ता निर्मितीसाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा सुरू आहे.
:महेंद्र देवाळकर, माजी सरपंच पिंपरी (कायर)
हे देखील वाचा:
तुम्ही फक्त साद घाला, मी प्रतिसाद देईल: ठाणेदार शाम सोनटक्के
Comments are closed.