बारावीच्या परीक्षेत शिंदोला येथील जुळ्या भावंडांनी मारली बाजी
श्रेयस आणि श्रेयाचे परिसरात कौतुक
तालुका प्रतिनिधी, वणी: भव्य स्वप्न पाहायचे आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रचंड कष्ट उपसायचे, मोठी महत्वाकांक्षा गाठण्यासाठी तेवढेच परिश्रम करायची तयारी असेल तर मनात आलेली कल्पना प्रत्यक्षात उतरू शकते. प्रतिकूल परिस्थितीतही असाध्य ते साध्य होऊ शकते. असचं काहितरी ध्येय निश्चित करून त्याच्या पूर्ततेसाठी झटणारी शिंदोला येथील संगीता आणि राजेंद्र गोरे यांची श्रेया, श्रेयस ही जुळीमुलं.. नुकताच बारावीचा निकाल लागला. यात दोघा भावडांनी घवघवीत यश संपादन केले. त्यामुळे साहजिकच महाविद्यालयाच्या प्राध्यापक, आईवडील यांच्यासह सर्वजण त्यांचे कौतुक करीत आहे.
आई संगीता गृहिणी आणि वडील राजेंद्र यांच छोटेखानी किराणा दुकान आहे. आज स्पर्धेच युग आहे. या स्पर्धेच्या युगात आपल्या मुलांनी खूप शिकून उंच शिखर गाठावं, नव्हे तर एक चांगला माणूस म्हणून जगावं एवढीच आईवडीलांना रास्त अपेक्षा असते. म्हणून शिकताना मुलांकडून परीक्षेत मोठ्या यशाची अपेक्षा न करता तणावमुक्त वातावरणात मुलांना शिक्षण देण्याचे प्रयत्न व्हायला हवा.
दोन्ही भावडांनी शिंदोला येथिल सिमेंट कंपनी द्वारे चालविल्या जाणाऱ्या माऊंट कारमेल कॉन्व्हेंटमध्ये सातवी तर सिमेंटनगर घुगूसला दहावी पर्यंत शिक्षण घेतले. दहावीत घवघवीत यश मिळविल्यानंतर साहजिकच आई वडिलांना दोन्ही भावडांच्या अलौकिक बुद्धिमत्तेची जाण झाली. आर्थिक परिस्थिती बेताची असताना मुलांच्या इच्छेनुसार त्यांना आयआयटीच्या तयारीसाठी नागपुरात ठेवलं. आयआयटीच्या मुख्य प्रवेश परीक्षेत श्रेयसला 94 तर श्रेयाला 98 टक्के गुण मिळाले.
पुढील तयारी चालू आहे. तर इकडे घुगूसच्या शिक्षण महर्षी श्रीहरी जीवतोडे उच्च माध्यमिक विद्यालयातून बारावी विज्ञान शाखेची परीक्षा नुकतीच उत्तीर्ण केली. यात श्रेयसला 85.38 टक्के तर श्रेयाला 83.85 टक्के गुण मिळाले. विशेष म्हणजे आयआयटी प्रवेश परीक्षेची तयारी करताना बारावीच्या अभ्यासासाठी यांना केवळ 26 दिवस मिळाले.
‘वणी बहुगुणी’च्या प्रतिनिधीनी संवाद साधत यशाचे रहस्य विचारले असता ते म्हणाले, अभ्यास करताना आपल्याला कोणत्या अडचणी येतात, त्या ओळखणे आणि त्यावर उपाययोजना करणे, हाच एकाग्रता वाढविण्याचा सरळ उपाय आहे. म्हणूनच आपल्याला प्रथमतः आपल्या अडचणींवर लक्ष केंद्रित करावे लागेल आणि त्यावर उपाय शोधण्यासाठी दृढ राहावे लागेल. आत्मविश्वास जागवावा लागेल. त्याशिवाय सकारात्मक दृष्टिकोन, अभ्यासाची वेळ, जलद वाचन, चिंतेपासून मुक्तता आणि स्वप्न पाहणे आदी बाबी आपली एकाग्रता वाढविण्यासाठी सहायक ठरू शकते. शेवटी त्यांनी आम्हाला आमचे आजपर्यंत लाभलेले शिक्षक आणि आईवडील यांचे मार्गदर्शन मिळाल्याचे सांगितले.
आईवडिलांशी संवाद साधताना साहजिकच मुलांच्या यशाने त्यांच्या डोळ्यात नकळत आनंदाश्रू भरून येत होते. वणीबहुगुणी कडून श्रेया आणि श्रेयसच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा !