एकीकडे नातीचे नामकरण तर दुसरीकडे आजोबाची आत्महत्या
धामणी येथे अल्पभुधारक शेतक-याची गळफास घेऊन आत्महत्या
नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव शहरापासून 3 किमी अंतरावर असलेल्या धामणी येथील एका अल्पभुधारक शेतकऱ्याने स्वत:च्या घरी नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दिनांक 10 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 8.30 वाजताच्या दरम्यान घडली. दिलीप गोविंदा राजूरकर (48) असे शेतकऱ्यांचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार बुधवारी मृतक दिलीप राजुरकर त्यांच्या मोठ्या भावाकडे त्यांच्या नातीच्या नामकरणाचा कार्यक्रम होता. त्यामुळे कुटुंबातील सर्व व्यक्ती त्यांच्या घरी कार्यक्रमासाठी गेले होते. दरम्यान दिलीप हे घरी एकटेच होते. त्यांनी रात्री 8.30 वाजताच्या सुमारास घरी नायलॉन दोरीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. कार्यक्रम संपल्यावर दिलीप यांची पत्नी व मुलगा घरी आल्यावर ही घटना उघडकीस आली.
या घटनेची नोंद मारेगाव पोलीस स्टेशनला करण्यात आली. घटनेचा पंचनामा करून त्यांचे शव विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. दिलीप यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व विवाहीत मुलगी असा मोठा आप्तपरिवार आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दिलीप यांच्याकडे 3 एकर शेती होती. त्याच्यावर कर्ज असल्याने ते नेहमी आर्थिक विवेचनेत राहायचे अशी माहिती मिळत आहे.
हे देखील वाचा: