विद्यार्थी असलेल्या युवा शेतक-याची गळफास घेऊन आत्महत्या

आपटी येथील घटना, कधी थांबणार आत्महत्येचे सत्र?

भास्कर राऊत, मारेगाव: आपटी गावातील कॉलेजचा विद्यार्थी असलेल्या युवा शेतक-याने गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी दुापारी ही घटना उघडकीस आली. प्रज्वल मोहन बोढे असे मृत तरुणाचे नाव असून तो 19 वर्षाचा होता. तो वरोरा येथे एका कॉलेजमध्ये शिकत होता. शिक्षण घेणाऱ्या एका युवा शेतकऱ्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

प्रज्वल हा वरोरा येथील एका कॉलेजमध्ये बी. कॉम. पहिल्या वर्षाला शिकत होता. नेहमीप्रमाणे  तो वरोरा येथून घरी आला. आईवडिलांना वाटले की, तो आराम करीत असेल. थोडया वेळाने त्याच्या खोलीत  जाऊन पालकांनी जे बघितले ते फारच धक्कादायक होते‌‌. पंख्यासाठी स्लॅबला असलेल्या लोखंडी अँगलला नायलॉन दोराच्या सहाय्याने त्याने गळफास घेतला होता.

सर्वप्रथम यावर कुणाचाच विश्वासच बसला नाही. कोणतेही व्यसन नसलेला आणि अभ्यासात हुशार असलेल्या प्रज्वलला हा टोकाचा निर्णय घेण्याची वेळ का आली हे मात्र समजण्यापलीकडचे आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

प्रज्वलच्या नावावर 7 एकर शेती असल्याचे समजते. मागील वर्षी ओला दुष्काळ आणि या वर्षीसुद्धा सोयाबीन पीक हातचे जाणार ही भीती. कपाशीचीही अशीच अवस्था. त्यामुळे सतत दुष्काळ आणि आणीबाणीचा सामना करणाऱ्या प्रज्वलने काही खासगी सावकारांकडून कर्जही घेतल्याचे कळते. त्यामुळे कर्जाच्या दरीत असणाऱ्या प्रज्वलने आत्महत्येसारखे पाऊल उचलल्याचे कळते. प्रज्वलला आईवडील आणि एक बहीण आहे. ऐन तारुण्यात प्रज्वलने असा निर्णय घ्यायला नको होता, असे त्याच्या जवळच्या लोकांचे म्हणणे आहे.

पांढऱ्या सोन्याचा आणि काळ्या सोन्याचा जिल्हा म्हणून यवतमाळ जिल्ह्याची ख्याती आहे. त्याचसोबत या जिल्ह्याला एक मोठा डाग लागलेला आहे तो म्हणजे आत्महत्यांचा.  मारेगाव तालुक्यातला तरुण शेतकरी. डोळ्यांत हिरवी स्वप्नं घेऊन फुलवणारा. त्याच्या निर्णयाने संपूर्ण मारेगाव तालुक्याला हादरा दिला. 

Comments are closed.