मारेगाव तालुक्यात पुन्हा शेतकरी आत्महत्या…. आई वडिलांनी दोन वर्षात गमावले दोन्ही तरुण मुले

देवाळा येथील युवा शेतक-यांने प्राशन केले विष

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील देवाळा येथील शेतकरी जनार्दन कवडू महाकुलकर (40) यांनी स्वतःच्या शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी 10 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

कुटुंबाचा आधार असलेला जनार्दन हा एकुलता एक मुलगा वडिलांच्या नावावर असलेल्या पाच एकर शेतजमिनीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. सध्या जनार्धन शेतामध्ये फवारणीचे काम करीत होता. तर त्याचे आईवडिल बाहेरगावी गेले होते. आज बुधवारी दिनांक 28 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजताच्या सुमारास जनार्धन शेतात गेला होता.

तेथेच त्यांनी फवारणीसाठी आणलेले मोनोसील नावाचे कीटकनाशक प्राशन केले असा अंदाज आहे. 10 वाजता त्याची पत्नी शेतात गेली असता तिला जनार्धन पडलेल्या अवस्थेत आढळला व त्याच्या तोंडातून फेस आलेला दिसला. हा प्रकार लक्षात येताच तिने याची माहिती जवळच्या परिचितांना दिली. त्याच्या परिचितांनी जनार्धनला तात्काळ मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले. परंतु त्यांची प्राणज्योत मालवली होती.

दोन वर्षापूर्वी भावाचा मृत्यू
दोन वर्षांपूर्वी जनार्धनच्या भावाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे त्याच्या वृद्ध आईवडिलांचा जनार्धन हाच आधार होता. त्याच्यावर आईवडिल व त्याच्या कुटुंबाची जबाबदारी होती. कामावते दोन्ही मुले ऐन जवानीत गेल्याने आईवडील हतबल झालेले आहे. यावर्षी अतिवृष्टीने नापिकीची परिस्थिती व कुटूंबावर असलेले कर्जाचे ओझे यामुळे तो आर्थिक विवंचनेत असल्याची माहिती आहे. जनार्धनच्या आत्महत्येमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा आप्तपरिवार आहे. 

मारेगाव तालुक्यातील आत्महत्या थांबणार कधी?
तालुक्यात सतत आत्महत्या होत असताना यावर शासनाकडून कोणत्याही प्रकारचा तोडगा किंवा उपाययोजना केली जात नाही. लोकप्रतिनिधी आणि गावपुढारीही या प्रश्नाबाबत कधीही गंभीर दिसत नाही. त्यामुळे या आत्महत्या थांबण्याऐवजी वाढतच आहे. काही सामाजिक संस्था यावर जनजागृती करण्याचे काम करीत आहे. पण त्याचा देखील कोणताही उपयोग होताना दिसत नाही.

हे देखील वाचा: 

अल्पवयीन मुलीचे लावले लग्न, मुलीच्या आईला अटक

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.