भास्कर राऊत, मारेगाव: जुनिअर कॉलेजमध्ये शिकत असलेल्या एका कुमारिकेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील हिवरा (मजरा ) येथे घडली आहे. प्रांजली राजू बोढे (18) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. ती 12वीला शिक्षण घेत असल्याचे कळते.
सध्या आत्महत्यांनी तालुक्यात कळस गाठलेला आहे. दर आठवड्यात किमान एक ते दोन आत्महत्या होत आहेत. या आत्महत्यांवर शासनाकडून ठोस उपाययोजना केल्या जात नाही. हिवरा ( मजरा )येथील ही 18 वर्षीय युवती आपल्या कुटुंबीयांसोबत आनंदात जीवन जगत होती. तिच्या पालकांकडे दोन ते तीन एकर शेती असल्याची प्राथमिक माहिती आहे.
तसेच या मुलीचे वडील काही शेती ठेक्याने करतात. अशातच ती आज दि. 2 जानेवारीला आपल्या कुटुंबियांसोबत शेतामध्ये गेली होती. दुपारी दोनच्या दरम्यान ती बैलांना पाणी पाजून आणते म्हणत आईवडलांपासून थोडी दूर दुसऱ्या शेतामध्ये गेली. त्या शेतामध्ये साहित्य ठेवण्यासाठी छोटासा कोठा आहे. तेथेच या मुलीने बैल बांधण्याच्या दोराने गळफास घेतला.
मुलगी परत आली नाही म्हणून पालकांनी जाऊन बघितले. तेव्हा ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. माहिती मिळताच मारेगाव पोलीस घटनास्थळी पोहोचले. मुलीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आणला. वृत्त लिहेपर्यंत पंचनामा व्हायचा होता. पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.
Comments are closed.