शेतक-यांची सरकारकडून फसवणूक, सरकारवर गुन्हे दाखल करा
सुकानू समिती वणीची मागणी, पोलीस ठाण्यात दिलं निवेदन
वणी: कर्जमाफी, शेतमाला भाव इत्यादी विषयांवर सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहे. त्यामुळे सरकारवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी वणी तालुक्यातील सुकाणु समितीच्या वतीने करण्यात आली. या प्रकरणी समितीच्या वतीने वणी पोलीस ठाण्यात ठाणेदारांना निवेदन देण्यात आलं.
सरकारने सातत्याने शेतकरीविरोधी धोरणे घेतली आहेत. सरकारच्या या धोरणांमुळे शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडले आहे. शेतक-यांच्या या आत्महत्या म्हणजे खरे तर शेतक-यांच्या सरकारने केलेल्या हत्याच आहेत. कर्जमुक्त करताना सरकारने आपले आश्वासन व शब्द न पाळता अनेक अटी लावत शेतक-यांची घोर फसवणूक केली आहे. असा आरोप करत सुकानु समितीने सरकारवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
(वणीत पतंजली मेगा स्टोअर्स सुरू)
या पार्श्वभूमीवर सरकारवर फसवणुकीचा (कलम 420), शेतक-यांना आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचा (कलम306) व शेतक-यांच्या हत्या केल्याचा (कलम 302) गुन्हा दाखल करावा अशी मागणी समितीने केली आहे. यावेळी सुकाणू समिती वणीचे प्रवीण खानझोजे, अजय धोबे, अनिल घाटे, देवराव धांडे, मनोज काळे, अखिल सातोकर, सिद्धीक रंगरेज, विकेश पानघाटे आदी सदस्य उपस्थित होते.