वणीत सुकाणू समितीचं चक्काजाम आंदोलन यशस्वी
खासदार व आमदारांना गावबंदी करण्याचा आंदोलनांचा इशारा
वणी: सोमवारी दिनांक 14 ऑगस्टला वणीत सुकाणू समितीचं रास्ता रोको आंदोलन झालं. या आंदोलनात मोठ्या संख्येनं शेतकरी सहभागी झाले होते. दुपारी 1 वाजता जिजाऊ चौकात वणी तालुक्यातील खेड्यापाड्यातून शेकडो शेतकरी गोळा झाले होते. यावेळी शेतक-यांनी चक्का जाम करून सरकारच्या शेतीविषयक धोरणांचा निषेध नोंदवला. सुकाणू समितीच्या प्रतिनिधींनी विविध मागण्यांचं निवेदन उपविभागीय अधिका-यांना सादर केलं. तसेच शेतक-यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास खासदार आणि आमदारांना गावबंदी करण्याचा इशाराही दिला.
राज्यातील शेतक-यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून शेतक-यांना सरसकट कर्जमुक्त करावे व त्यांच्या शेतमालाला हमी भाव अधिक 50 % नफा भाव घोषित करावा, स्वामिनाथन आयोग लागू करावा, दूधाला 50 रुपये प्रती लीटर भाव देण्यात यावा, यासह विविध मागण्याना घेऊन यापूर्वी आंदोलनं करण्यात आली. मात्र सरकारनं शेतक-यांच्या या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे राज्यभरात पुन्हा सुकाणू समितीच्या द्वारे आंदोलन करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार सोमवारी वणीत चक्काजाम आंदोलन करण्यात आलं.
यावेळी उपस्थित शेतक-यांनी सरकारविरोधात नारे लगावत सरकारच्या धोरणांचा निषेध केला. कॉ. अनिल घाटे, देवराव पाटील धान्डे, दिलीप भोयर, कॉ. शंकर दानव कुमार मोहरमपुरी यांनी उपस्थित शेतक-यांना संबोधिले. या मोर्चाचे सूत्रसंचालन अजय धोबे यांनी केले तर आभार कॉ. दिलीप परचाके यांनी मानले. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी मिलिंद पाटील, दशरथ पाटील, टिकाराम कोंगरे, बालाजी काकडे, मंगल तेलंग, दत्ता बोबडे, ऍड. अमोल टोन्गे, उत्तम पाचभाई, आकाश सूर, राहुल खारकर, राहुल खिरटकर, रुद्रा कुचनकर, पुंडलिक मोहितकर इत्यादींनी परिश्रम घेतले. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक मुकुंद कुळकर्णी यांनी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला होता.