विविध पक्ष, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली संपकऱ्यांची भेट
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला वणीतील संघटनांचा पाठिंबा
निकेश जिलठे, वणी: सध्या एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू आहे. बुधवारी संपाचा दुसरा दिवस होता. या दिवशी वणीतील विविध पक्ष आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी संपकरी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांच्या संपाला पाठिंबा दिला. यात संभाजी ब्रिगेड, ओबीसी परिषद, प्रहार, युवक काँग्रेस, बहुजन समाज पार्टी, कम्युनिष्ट पक्ष इत्यादी संघटना होत्या.
बुधवारी दुपारी विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी डेपोत जाऊन कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांची बाजू समजावून घेतली. जोपर्यंत सरकार मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत स्थानिक पातळीवर आपल्या सोबत राहू अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी अनिल घाटे, अजय धोबे, प्रवीण खानझोडे, अखिल सातोकर, ऍड अमोल टोंगे, विकेश पानघाटे, सिद्दिक रंजरेग, आशिष रिंगोले इत्यादी उपस्थित होते.
सध्या विविध मागण्यांसाठी एसटीचे कर्मचारी संपावर गेले आहेत. एकाच पदावरील दुसऱ्या महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या आणि एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये विलक्षण फरक आहे. वीजवितरण, पीडब्ल्यूडी, इत्यादीमध्ये काम करणाऱ्या क्लर्क आणि ड्रायव्हरला वेगळा पगार आहे, तर एसटीमहामंडळातील काम करणाऱ्या याच पदावरील कर्मचाऱ्यांना अत्यल्प वेतन आहे. वेतनवाढ करून हे वेतन इतर महामंडळातील पदावर असलेल्या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या वेतना इतके करावे ही प्रमुख आणि इतर मागण्या घेऊन राज्यभरातील एसटी डेपो कर्मचारी संपावर गेले आहेत.