सुप्रसिद्ध सूरदेवी देवस्थानाला लवकरच होणार पाय-या

डॉ. लोढा यांच्या पुढाकाराने व गावक-यांच्या श्रमदानातून कामाला सुरूवात

0

सुशील ओझा, झरी: सूरदेवी झरी तालुक्यातील एक प्रसिद्ध देवस्थान… निसर्गरम्य ठिकाणी, डोंगरावर हे देवीचं मंदिर आहे. जागृत देवस्थान म्हणून या देवस्थानाची ओळख आहे. त्यामुळे भाविकांची चांगलीच गर्दी या ठिकाणी असते. मात्र निसर्गरम्य ठिकाणी आणि लोकांची श्रद्धा असलेलं हे मंदिर अद्यापही दुर्लक्षीत होतं. मंदिराला पाय-या नसल्याने पायी जाण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. शिवाय अनेकांना पायी चालण्याचा त्रास होतो त्यामुळे देवस्थातात इच्छा असूनही अनेकांना जाता येत नव्हतं तसेच अनेक वृद्ध लोक खालूनच दर्शन घेऊन परत जात असे. मात्र राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांच्या पुढाकारातून आणि परिसरातील गावातील लोकांच्या श्रमदानातून या मंदिराला आता पाय-या बांधण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांचे आदिवासी बहुल अशा झरी तालुक्यात विविध आरोग्य शिबिर होतात. शिवाय या भागात अनेक गाव डॉ. लोढा यांनी दत्तक घेतलेले आहे. त्यामुळे आरोग्य शिबिराला आलेल्या एक शिबिरार्थ्यांनी त्यांच्याशी संपर्क साधत सूरदेवी या देवस्थानाला भेट देण्याचं आवाहन केलं होतं. डॉ. लोढा यांनी भेट दिली तेव्हा तिथल्या लोकांनी त्यांच्याजवळ मंदिराला पाय-या नसल्याची खंत व्यक्त केली. डॉ. लोढा यांनी जर गावक-यांनी साथ दिली तर लगेच कामाला सुरूवात करण्याचं वचन दिलं. अखेर श्रमदानातून काम करण्याचं ठरलं.

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी डॉ. लोढा यांच्या हस्ते पाय-यांच्या बांधकामाचं भूमिपूजन करण्यात आलं. या मंदिराला तब्बल 300 पाय-या बनविण्यात येणार आहे. हे कार्य 9 दिवसांत पूर्ण कऱण्याचं ध्येय ठरलं असून नवव्या दिवशी या पाय-यांच्या लोकार्पण कार्यक्रम असणार आहे.

कामाचं डॉ. लोढा यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी बोलताना डॉ. लोढा म्हणाले की आदिशक्तीचा सन्मान आपल्या कृतितून दिसायला हवा. महिलांसाठी विविध उपक्रम राबवणे, महिलांना योग्य तो सन्मान देणे, त्यांच्या पुढे जाण्यास प्रोत्साहन देणे असे महिलांविषयी कार्य हाच आदिशक्तीचा सन्मान असल्याचं ते म्हणाले. कार्यक्रमाला आजूबाजूच्या गावातील लोक मोठ्या संख्येने हजर होते.

Leave A Reply

Your email address will not be published.