वारंवार त्रास दिल्यानेच संतापाच्या भरात खुलासा – खैरे
राज्यभरात व्हायरल झालेल्या खुलाशानंतर खैरेंवर निलंबनाची कारवाई
जितेंद्र कोठारी, वणी: मला वारंवार शो कॉज नोटीस देऊन त्रास दिला जात असल्यानेच संतापाच्या भरात असे पत्र लिहिले असल्याचा खुलासा बाळासाहेब उर्फ अरुणकुमार खैरे यांनी केला आहे. त्यांनी वरिष्ठांनी कारणे दाखवा नोटीसला दिलेले अजब उत्तर सध्या सोशल मीडियात व्हायरल होत असून प्रशासकीय वर्तुळात याची चांगलीच चर्चा होत आहे. सतत गैरहजर राहिल्याने तहसिलदारांनी कारणे दाखवा नोटीस पाठवल्यानंतर त्यावर ‘गाड्या बंद असताना उडत येऊ का? असे प्रशासकीय आचारसंहितेचे उल्लंघन करत उत्तर दिल्याने मुळचे वणीचे व महागाव येथे कार्यरत असलेले अरुणकुमार खैरे यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच त्यांच्यावर 188 व 269 नुसार गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
वणीतील येथील रहिवासी असलेले अरुण कुमार खैरे हे महागाव तहसिल कार्यालयात अव्वल कारकून या पदावर कार्यरत होते. यांची कवी, साहित्यिक अशीही परिसरात थोडीबहुत ओळख आहे. लॉकाडाऊनच्या काळात ते वणीतील त्यांच्या घरी परतले. त्यामुळे 26 मार्चपासून ते कार्यालयात गैरहजर होते. याबाबत त्यांना व्हॉट्सऍपवर वारंवार कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली. त्यावर त्यांनी जे उत्तर दिले त्याची एकच चर्चा कर्मचारी वर्गात होत आहे. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी याची प्रतिलिपी इतर अधिका-यांनाही व्हॉट्सऍपवर पाठवल्याने हे पत्र चांगलेच व्हायरल झाले. अखेर या प्रकऱणी खैरे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली व त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे या पत्रातील मचकूर?
पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच प्रशासनाने एवढी महामारी असताना घराबाहेर पडू नका असे टीव्हीवरून आवाहन केले आहे. तुम्ही जिथे आहात तिथेच थांबून राहा असा सल्ला त्यांनी दिला आहे. लॉकडाऊनमुळे विमान, रेल्वे, एसटीबस, ट्रॅव्हल्स बंद केले आहे. याची आपणास कल्पना असूनही आपण वारंवार मला कारणे दाखवा नोटीस देऊन माझे मानसिक संतुलन का बिघडवत आहात? असा सवालही त्यांनी पत्रातून केला आहे. पुढे ते लिहितात की समजा तुम्ही मुंबईमध्ये अडकून पडले आहात आणि मी तुमच्यावर कुत्रासारखा ओरडून सारखे ‘या या हजर व्हा’ असे म्हणत असेल तर लोक मला पागल झाला म्हणतील. 2-4 महिन्यापासून तुम्ही असे वेड्यासारखे का वागत आहात हेच मला कळत नाही.
पुढे ते म्हणतात की मी कार्यालयात नसल्याने कार्यालयीन काम बंद पडले आहे का? समजा मी किंवा तुम्ही दवाखान्यात भरती असेल, किंवा मी अथवा तुम्ही जर उद्या मेलो तर तहसिल बंद पडेल का? शासन निर्णयानुसार 10 टक्के कर्मचारी उपस्थित असताना तुम्ही अधिक कर्मचा-यांना का बोलवत आहात? महागाव तहसिलमध्ये पुरेसे कर्मचारी असतानाही तुम्ही केवळ त्रास देण्याच्या उद्देशाने बोलवत आहात. सध्या लॉकडाऊनमुळे कार्यालयातील कर्मचारी अडकून पडल्याने त्यांना उपस्थित समजून त्यांना पूर्ण वेतन द्यावे असा देखील शासन आदेश आहे. असे त्यांनी पत्रात नमुद केले आहे.
तुम्ही मला 24 तासांच्या आत पत्राचे उत्तर देण्यास सांगितले आहे. मी वणीला अडकन असल्याची माहिती तुम्हाला आहे. त्यातच बस बंद असताना मी काय उडत येऊ का? त्यामुळे तुम्ही जबरदस्ती करू नका. 17 मे रोजी लॉकडाऊन उघडण्याची शक्यता आहे. जर बस सुरू झाली तर मी येईल. तसेच तुम्ही घाबरू नका, मी आल्यावर सतत 10-15 दिवस एकटाच काम करणार आहे. असे देखील त्यांनी या पत्रात नमुद केले आहे.
”परत या ना बाळासाहेब…”
अरुणकुमार खैरे यांना गैरहजेरीबाबत व कामावर रुजू होण्यासाठी तहसिलदार नीलेश मडके यांनी अनेक पत्र पाठवले. त्याला त्यांनी जे उत्तर दिले ते ‘ऐतिहासिक’ ठरले. या पत्राला त्यांनी अनेक शासकीय आदेशाचे संदर्भ जोडले होते. त्यात त्यांनी शासनाच्या एका निर्णयाचा संदर्भ जोडून कार्यालयातत 10 टक्के कर्मचारी उपस्थित असताना मला का बोलवत आहात? असा सवाल केला होता. मात्र त्यातच ते अडकले आहेत. लॉकडाऊनच्या काळात शासकीय कार्यालयात 10 टक्के कर्मचारी उपस्थित राहतील पण इतर कर्मचारी मुख्यालय सोडणार नाही, जेणे करून गरज पडल्यास त्यांना कामकाजावर तात्काळ बोलवता येईल अशा आषयाचा तो आदेश आहे. मात्र संदर्भ देण्याच्या भरात त्यांच्या डोक्यातून हा मुद्दा निघून गेला.
उडत जाण्याऐवजी अखेर विकेट उडाली….
कोविड 19 च्या अनुशंगाने अरुणकुमार खैरे यांची नियंत्रण कक्षात नेमणूक करण्यात आली होती. तसेच त्यांच्याकडे वसुलीचे ताळमेळ सादर करण्याचे काम दिले गेले होते. मात्र त्यांनी कोणतीही सूचना न देता मुख्यालय सोडल्याचे निदर्शनास आले. त्याबाबत त्यांना 26 मार्च रोजी गैरहजर राहण्याबाबत कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती. त्याला त्यांनी 29 मार्चला खुलासा दिला. त्यात त्यांनी 27 तारखेला सर्दी, खोकला झाल्याने त्याच दिवशी खासगी वाहनाने महागाव सोडून वणीला गेल्याचा खुलासा केला. त्यानंतर त्यांना वेळोवेळी कारणे दाखवा नोटीस देऊन खुलासा मागण्यात आला होता. मात्र त्यांनी कोणताही खुलासा न देता 9 एप्रिलला एक खुलासा दिला. तोच खुलासा व्हायरल झाला.
सर्दी खोकला झाल्यास महागाव येथे तपासणी करणे गरजेचे असताना त्यांनी कुणाला न कळवता वणी गाठले. संचारबंदीमध्ये वाहनाला बंदी असताना त्यांनी परवानगी न काढता खासगी वाहनाने महागावहून प्रवास करत वणी गाठली. हे वर्तन कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्याच्या विरोधात आहे. तसेच त्यांनी दिलेला खुलासा हा अशोभणीय भाषेत असल्याने त्यांच्यावर अखेर निलंबनाच्या कारवाईचा बडगा उगारण्यात आला. यासोबतच त्यांच्यावर 188 व 269 नुसार पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे अरुणकुमार खैरे यांना याआधीही एकदोनदा निलंबन केल्याची माहिती आहे.
खुलासा संतापाच्या भरात लिहिला – अरुणकुमार खैरे
वारंवार कारणे दाखवा नोटीस दिली जात असल्याने मी चिडून हा खुलासा लिहिलेला होता. मुख्यालय सोडून जाण्याची परवानगी नसताना कोणतीही सूचना न देता मुख्यालय सोडले ही माझी चूक होती. मात्र अधिकारी वारंवार त्रास देतात. त्यांच्या सततच्या कारणे दाखवा नोटीसमुळे त्रस्त होऊन अखेर संतापाच्या भरात मी हा खुलासा लिहिला. तसेच हा खुलासा मी नाही तर अधिका-यांनीच व्हायरल केल्याने तो राज्यभर पोहोचला.
– अरुणकुमार खैरे, निलंबीत अव्वल कारकून
अरुणकुमार खैरे यांची परिसरात तसेच विभागात एक कवी, साहित्यिक अशी ओळख आहे. अऩेक विषयावर त्यांचे लेख, कविता सोशल मीडियात प्रकाशित होत राहतात. त्याचे पुस्तकही प्रकाशित झालेले आहे. मात्र तसे असतानाही प्रशासकीय आचारसंहितेचे पालन न करता त्यांनी उर्मट भाषेत खुलासा लिहिण्याची चूक कशी केली असा प्रश्न विचारला जात आहे. गाड्या बंद असल्याने उडत येऊ का असा उलट प्रश्न विचारणा-या खैरे यांचीच विकेट उडाल्याने परिसरात व प्रशासकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.