शाळा क्र . 4 मध्ये कचरा व्यवस्थापन जनजागृती कार्यक्रम
विद्यार्थी, नागरिक व स्वयंसेवी संस्थांचा सक्रिय सहभाग
भूषण आदे ,वणी: वणी येथील लोकनायक बापुजी अणे नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा क्रमांक 4 येथे स्वच्छ महाराष्ट्र अभियान 2.0 अंतर्गत कचरा व्यवस्थापन जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमात नागरिक, विद्यार्थी आणि स्थानिक स्वयंसेवी संस्थांचा सक्रिय सहभाग दिसून आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंदना परसावार यांनी कार्यभार सांभाळत स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, “स्वच्छता ही केवळ मोहिम नसून एक जीवनशैली आहे. प्रत्येकाने आपल्या परिसरातील कचरा व्यवस्थापनात जबाबदारीने भाग घ्यावा.”

मुख्य पाहुणे किशोर परसावार यांनी प्लॅस्टिकमुक्त गाव–शहर ही गरज लक्षात घेता जनसहभागाचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी नागरिकांना ओला व सुका कचरा वेगळा करण्याचे आवाहन केले.
वैशाली गवई व पवार यांनी मार्गदर्शन करत कचरा कमी करणे, पुर्नवापर आणि पुनर्निर्मिती (3R) याबाबत सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाचे संचालन आणि शेवटी आभारप्रदर्शन जयप्रकाश सूर्यवंशी यांनी उत्तमरीत्या पार पाडले. त्यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानत अशा उपक्रमांमुळे स्वच्छ व आरोग्यदायी समाज घडण्यास मदत होते असे सांगितले.
या उपक्रमामुळे परिसरात स्वच्छतेबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून भविष्यात अशा जनजागृती कार्यक्रमांना आणखी गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.



Comments are closed.