स्माईल फाउंडेशनतर्फे गरजू विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

“सायकल बँक” उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; वापरात नसलेल्या सायकल दान करण्याचे आवाहन

बहुगुणी डेस्क, वणी: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवासासाठी मदत व्हावी, तसेच वणीतील गरजू विद्यार्थ्याना शाळेत जाण्यासाठी स्माईल फाउंडेशनतर्फे “सायकल बँक” उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना सायकलींचे मोफत वाटप करण्यात आले. दररोज लांब पायपीट करून शाळेत पोहोचणाऱ्या विद्यार्थ्यांची गरज ओळखून फाउंडेशनने हा स्तुत्य उपक्रम राबविला. ‘आता शाळा दूर असली तरी चिंता नाही, आमच्या सायकली खूप छान आहेत,’ अशा शब्दांत विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. या वाटप कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष सागर देविदास जाधव व सचिव आदर्श दाढे उपस्थित होते. फाउंडेशनच्या सामाजिक कार्याबद्दल सर्वत्र कौतुक व्यक्त झाले.

स्माईल फाउंडेशनतर्फे दरवर्षी “सायकल बँक” हा उपक्रम राबवला जातो. दरवर्षी या उपक्रमांतर्गत मोठ्या प्रमाणात दान आलेल्या सायकली गरजूं पर्यंत पोहोचवल्या जातात. उपक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष सागर जाधव, उपाध्यक्ष पियुष आत्राम, सचिव आदर्श दाढे, तसेच विश्‍वास सुंदरानी, उत्कर्ष धांडे, खुशाल मांढरे, कुणाल आत्राम, रोहन कोरपेनवार, सचिन जाधव, तन्मय कापसे, अनिकेत वासरीकर, कार्तिक पिदुरकर, जगदीश गिरी, शुभम भेले, भूषण पारवे, सिद्धार्थ साठे आदी सदस्यांनी परिश्रम घेतले.

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

सायकल ठरणार टर्निंग पॉइंट
तुमच्या घराच्या कोपऱ्यात पडलेली एक सायकल, एखाद्या विद्यार्थ्याच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरू शकते. दररोज शाळेसाठी अनेक विद्यार्थी किलोमीटरचा प्रवास पायी करतात ते फक्त शिक्षण मिळवण्यासाठी. पण प्रवासातील हीच अडचण त्यांच्या स्वप्नांना अडथळा बनते. आपल्या वापरात नसलेली सायकल दान करा, ती एखाद्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहचती केली जाईल. ही केवळ सायकल नाही, तर ज्ञानाकडे नेणारी पहिली पायरी आहे. – सागर जाधव, अध्यक्ष स्माईल फाउंडेशन

तुमच्या घराच्या कोप-यात वापरात नसलेली सायकल दान करावी, असे आवाहन स्माईल फाउंडेशन तर्फे करण्यात आले आहे. यासाठी 7038204209 या क्रमांकावर संपर्क साधावा लागणार आहेय स्माईल फाउंडेशनची टीम सायकल त्या ठिकाणाहून गोळा करेल. तसेच ज्यांना सायकल विकत घेण्यासाठी आर्थिक मदत करायची आहे ते आर्थिक मदत देखील करू शकतात. 

Comments are closed.