आज रंगणार सेमीफायनलचा थरार: आमेर नाईट रायडर Vs जन्नत 11 व राजपूत रॉयल्स Vs रेनबो 11

शुक्रवारी रंगली सेमीफायनलसाठीची झुंज... रजनिश पांडे, सारंग माथनकर, रवी राजूरकर यांची तुफानी फटकेबाजी, तर प्रणय शेंडे, नितीन पत्रकार यांनी बॉलिंगने पलटवले सामने

विवेक तोटेवार, वणी: आज लीगचा 9 वा दिवस हा अनेक टीमसाठी ‘करो या मरो’चा होता. फक्त सध्या क्रमांक 1 वर असलेल्या आमेर 11 संघाची सेमीफायनलसाठी जागा निश्चित होती. तर इतरांना सेमीफायनलसाठी (टॉप 4) झुंज द्यावी लागणार होती. त्यामुळे सर्वच टीम करो या मरो भावनेने आज खेळले. शेवटी जन्नत 11 संघाने दुसरे स्थान गाठत सेमीफायनलमध्ये जागा पक्की केली. राजपूत रॉयल्स, रेनबो 11 व माऊली मराठी या 3 संघापैकी केवळ 2 संघानाच सेमीफायनल (सुपर 4) मध्ये जागा मिळणार होती. अखेर या कॉम्पिटीशनमध्ये माऊली मराठा टीम बाहेर पडली. आज दुपारी आमेर नाईट रायडर Vs जन्नत 11 यांच्यात पहिली सेमीफायनल होणार आहे. तर दुपारी 3 वाजता दुसरी सेमीफायनल ही राजपूत रॉयल्स Vs रेनबो 11 संघात होणार आहे. पहिल्या सेमीफायनलमध्ये जिंकणारा संघ हा थेट फायनलमध्ये जाणार आहे. तर हरणारा संघ हा दुस-या सेमीफायनलमध्ये जिंकणा-या संघाशी खेळणार आहे. यातून विजयी होणारा संघ फायनलमध्ये प्रवेश करेल. उद्या रविवारी फायनल खेळली जाणार आहे. 

आजचा दिवस सारंग माथनकर, रजनीश पांडे, रवी राजूरकर यांच्या फटकेबाजीने गाजला तर प्रणय शेंडे, नितीन पत्रकार यांनी आज आपल्या बॉलिंगची जादू दाखवली. शेवटचा राजपूत रॉयल्स व एम ब्लास्टर विरुद्धचा सामना सेमीफायनलसाठी चालणा-या चढाओढीमुळे चांगलाच रंगतदार झाला.

आज प्रथम सामना हा रेनबो विरुद्ध माऊली मराठा यांच्यात खेळला गेला. दोन्ही संघासाठी सेमीफायनल साठी मॅच जिंकणे गरजेचे होते. रेनबो संघाने प्रथम फलंदाजी करीत निर्धारित 10 षटकात 4 बाद 106 धावा केल्या. यांच्याकडून सुमित ठाकूरवार (35) तर डावखुरा फलंदाज सारंग माथनकर याने धडाकेबाज 19 चेंडूत 2 चौकार व 3 षटकार ठोकत 39 धावा ठोकल्या. धावाचा पाठलाग करतांना माऊली संघ 6 बाद 87 धावाच करू शकला. हा सामना रेनबो संघाने 19 धावांनी जिंकला. माऊली संघाकडून अनिल मोहाजे व संतोष ताजने यांनी चिवट खेळीनी काही वेळ सामन्यात रंगत आणली. परंतु संतोष ताजने बाद होताच कुणीच खेळपट्टीवर टिकू शकला नाही. सारंग माथनकर याला सामनावीर ठरविण्यात आले.

फटकेबाजी करताना माथनकर

दुसरा सामना हा छत्रपती वारीअर्स विरुद्ध किंग्ज 11 यांच्यात खेळल्या गेला. प्रथम फलंदाजी करीत छत्रपती संघाने 7 बाद 107 धावा केल्या. छत्रपती संघाकडून आजही रजनीश पांडे याने आपली कमाल दाखवली. त्याने अवघ्या 24 चेंडूत 3 चौकार व 3 षटकात ठोकत 43 धावा केल्या. तर विपुल पटेल याने 17 चेंडूत 28 धावा केल्या. लक्षाचा पाठलाग करतांना किंग्ज 11 संघ 9 बाद 71 धावाच करू शकला. किंग्ज 11 संघाकडून अमोल मोहिते याने सर्वाधिक 30 धावा केल्या. संघाचा कोणताही खेळाडू 10 चा आकडाही पार करू शकला नाही. हा सामना छत्रपती संघाने 36 धावांनी जिंकला. रजनीश पांडे हा सामनावीर ठरला.

षटकार लगावताना रजनीश पांडे

तिसरा सामना हा जन्नत 11 विरुद्ध 11 टायगर रोअरिंग यांच्यात खेळला गेला. जन्नत 11 संघाला सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी हा सामना जिंकणे गरजेचे होते. जन्नत संघाने प्रथम फलंदाजी करीत 7 बाद 83 धावा केल्या. प्रणय शेंडे याने 12 चेंडूत 1 चौकार व 3 षटकार च्या मदतीने 28 धावा केल्या. 84 धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना टायगर संघ 9 बाद 61 धावाच करू शकला. जन्नत संघाकडून अक्षय ढेंगळे याने 2 षटकात 11 धावा देत 3 गडी बाद केले. हा सामना जन्नत संघाने 22 धावांनी सहजपणे जिंकत आपले सेमीफायनलमधले स्थान पक्के केले. सामन्याचा सामनावीर प्रणय शेंडे याला ठरविण्यात आले.

चौथा सामना हा श्री राम वारीअर्स विरुद्ध आमेर यांच्यात खेळला गेला. प्रथम फलंदाजी करत श्रीराम संघाने 4 बाद 92 धावा केल्या. कार्तिक देवडे याने 31 चेंडूत 6 चौकाराच्या मदतीने संघाकडून सर्वाधिक 42 धावा केल्या. त्याला मारोती परचाके (30) याने चांगली साथ दिली. लक्ष मोठे वाटत असले तरी आमेर संघाने 7. 4 षटकात 93 धावांचे लक्ष्य सहजपणे गाठले. आमेर संघाकडून तौसिफ खान याने 19 चेंडूत 2 चौकार व 3 षटकार ठोकत 31 धावा केल्या. शिवाय रवी राजूरकर याने आतिशी फलंदाजी करीत फक्त 14 चेंडूत 4 चौकार व 3 षटकार ठोकत 37 धावा केल्या. अष्टपैलू खेळ खेळणारा रवी राजूरकर हा सामनावीर ठरला. त्याने 2 षटकात अवघ्या 14 धावा देत 1 गडीही बाद केला.

षटकार खेचताना रवी राजूरकर

शेवटचा सामना हा राजपूत रॉयल्स व एम ब्लास्टर यांच्यात खेळला गेला. दोन्ही संघाला सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी हा सामना जिंकणे गरजेचे होते. राजपूत रॉयल्सने प्रथम फलंदाजी करीत 5 बाद 88 धावा केल्या. राजपूत संघाकडून अरविंद बेलेकर (21), अमित काकडे (15), मनोज कश्यप (19) तर मयूर घाटोळे याने आतिशी फलंदाजी करीत 10 चेंडूत 23 धावा ठोकल्या. 89 या लक्षाचा पाठलाग करतांना एम ब्लास्टर संघाची सुरवात चांगली झाली. सौरभ पिदूरकर व मोहमद आलिम यांनी चांगली भागीदारी करत विकेट्स टिकवून ठेवली. एम ब्लास्टर संघाची 6.4 षटकात 53 धावांवर दोन गडी बाद अशी धावसंख्या होती. संघ सहजतेने हे लक्ष गाठेल असे वाटत होते. शिवाय संघाचा विस्फोटक फलंदाज कर्णधार शोएब खान, संतोष पारखी हे अजून येणे बाकी होते. मात्र 8 व्या षटकात विनोद माहकुलकर याने अवघ्या 5 धावा देत विकेट टिकवून खेळणा-या सौरभला तंबूत पाठवले.

नितीन पत्रकार यांनी पलटवला सामना
आता खेळपट्टीवर तुफानी फलंदाज शोएब खान होता. 9 वे षटक घेऊन आले ते सीआरपीएफ जवान नितीन पत्रकार यांनी या षटकात पूर्ण खेळ पालटविला. एम ब्लास्टरला 12 चेंडूत 29 धावा हव्या होत्या. परंतु नितीनने प्रथम शोएब खान याला त्रिफळाचीत केले. तर 3 ऱ्या चेंडूत संतोष पारखी यालाही त्रिफळाचीत केले. नितीनने या षटकात 3 धावा देत 2 महत्वपूर्ण गडी बाद केले. त्यामुळे ब्लास्टर संघ 6 बाद 65 धावाच करू शकला. सामन्याचा सामनावीर अरविंद बेलेकर याला ठरविण्यात आले. त्याने अस्तपैलू खेळ खेळत 18 चेंडूत 21 धावा केल्या व गोलंदाजीत 2 षटकात 10 धावा देत 2 गडी बाद केले.

विस्फोटक शोएबला क्लिनबोल्ड करताना नितीन

अंकतालिका
1) आमेर – 15
2) जन्नत 11 – 11
3) राजपूत रॉयल्स -10
4) रेनबो – 10
5) माऊली मराठा -10
6) एम ब्लास्टर -9
7) किंग्ज 11 – 7
8) छत्रपती वारीअर्स – 6
9) 11 टायगर रोअरिंग -6
10) श्री राम वारीअर्स – 6

पाहा दिवसभरातील संपूर्ण मॅच…

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.