चक्क पोस्टाने पाठविला पत्नीला तलाक, पती विरुद्ध गुन्हा दाखल

तलाक ए बाईन (ट्रिपल तलाक) विरोधातील वणीतील दुसरे प्रकरण

 

जितेंद्र कोठारी, वणी: मुळच्या वणीतील एका विवाहित महिलेला मानसिक व शारीरिक त्रास देत तलाक ए बाइन (ट्रिपल तलाक) पद्धतीने तलाक देणाऱ्या पती विरुद्ध वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेच्या तक्रारीवरून आरोपी पती विरोधात मुस्लीम महिला (विवाहाचे अधिकाराचे संरक्षण ) कायदा २०१९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारचा गुन्हा दाखल करण्याची पोलीस ठाण्यातील ही दुसरी वेळ आहे.

सविस्तर वृत्त असे की वणी येथील मुस्लिम महिलेचे 2008 मध्ये वर्धा येथील एका मुस्लीम तरुणाशी मुस्लीम रीतीरिवाजा प्रमाणे निकाह झाला होता. लग्नानंतर 2 वर्ष तिच्या पतीने तिला चांगली वागणूक दिली. त्यानंतर पत्नीला पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याची कुणकुण लागली. त्यामुळे घरात वाद सुरु झाले. दरम्यान पतीने पत्नीचा मानसिक व शारीरिक छळ करण्यास सुरूवात केली.

लग्नाच्या 5 वर्षानंतर दररोजच्या त्रासाला कंटाळून महिला आपल्या मुलासह माहेरी वणी येथे राहायला आली. त्यानंतर ती आपल्या मुलासह वर्धा येथे सासरी गेली. मात्र पतीने मी दुसर लग्न केले, आता आपला काहीएक संबंध नाही, असे म्हणत पतीने पत्नी आणि मुलाला घरातून हाकलून दिले.

डिसेंबर 2022 रोजी आरोपी पतीने रजिस्टर्ड पोस्टाद्वारे तलाकनामा व सोबत 21 हजार 151 रुपयांचा डिमांड ड्राफ्ट हरजाना म्हणून पत्नीला पाठविला. तलाकनामा इंग्रजी भाषेत असल्यामुळे महिला तलाकनामा समजून घेण्यासाठी एका वकीलाकडे गेली. तेव्हा तिला पतीने खोटे व काल्पनिक आरोप करून तलाक ए बाइन (ट्रिपल तलाकचा एक प्रकार) पद्धतीने तलाक दिल्याचे समजले.

काय आहे तलाक ए बाईन?
तलाक ए बाईन किंवा तलाक ए किनाया हा एक ट्रिपल तलाकचा प्रकार आहे. यात एकाच वेळी 3 वेळा तलाक म्हणून तलाक दिला जातो. मुस्लिम धर्मानुसार तलाक देताना काही नियम आहे. तीन तलाक देताना काही अवधी आणि नियमांची जोड आहे. मात्र याचा गैरअर्थ काढून अनेक लोक एकाच वेळी प्रत्यक्ष बोलून, फोन द्वारा, पोस्टाद्वारा तीन तलाक देत होते. सुप्रीम कोर्टाने ऑगस्ट 2017 मध्ये एकाच वेळी तीन तलाक बोलून तलाक देण्याला असंवैधानिक आणि इस्लामच्या मूळ सिद्धांता विरोधात असल्याचा निर्णय दिला होता.

 ट्रिपल तलाकला बेकायदेशीर ठरवण्यात आल्याने पत्नीने 2 नोव्हेंबर 2023 रोजी वणी पोलीस ठाण्यात पती विरुद्ध तक्रार नोंदविली. वणी पोलिसांनी आरोपी विरुद्ध मुस्लीम महिला (विवाहाचे अधिकाराचे संरक्षण ) कायदा २०१९ नुसार गुन्हा दाखल दाखल करून प्रकरण पुढील तपासाकरिता वर्धा पोलिसांकडे वर्ग केले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.