लाच घेताना तलाठ्याला अटक
वणी (रवि ढुमणे): वणी तालुक्यातील मानकी, पेटुर,खेकडी या गावाचा महसूल कारभार बघत असलेल्या तलाठ्याने शेतकऱ्याला प्रमाणपत्र देण्यासाठी एक हजाराची लाच मागितली होती. याआधी कित्येक शेतकऱ्यांकडून त्याने रक्कम गोळा केली असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. लाच मागण्याचे प्रमाण वाढताच एक शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली आणि तलाठी लाच घेताना पंचासमक्ष एसीबीच्या जाळ्यात अडकला.
सध्या प्रशासकीय सेवेत रुजू असलेले काही अधिकारी कर्मचारी गलेलठ्ठ पगार मिळत असून देखील हव्यासापोटी गोरगरिबांना त्रास देत त्यांच्याकडून दमदाटी करीत अतिरिक्त वसुली करण्यात गुंग आहेत. असाच प्रकार वणीत घडला आहे. वणी तहसील कार्यालयात येणाऱ्या मानकी येथील तलाठी ज्ञानेश्वर अंबादास निमसटकर याने शेतातील पिकांच्या नोंदी केल्या होत्या. त्या नोंदीचा अहवाल सादर करण्यासाठी संबंधित शेतकऱ्याला एक हजार रुपयांची लाच मागितली. त्यावेळी इतर शेतकरी उपस्थित होते. पेरेपत्रकावर नोंद ककरण्यासाठी ही तडजोड केली. एकीकडे अठराविश्व दारिद्र्य, शेतमालाला भाव नाही. निसर्ग कोपला वरून सरकार ढोपराने सोलत आहे. अशा परिस्थितीत त्या शेतकऱ्याने एक हजार रुपये देण्याचे कबूल केले. मात्र मनात धग कायम होती. शेवटी नाईलाजाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली.
अखेर 31 जानेवारीला तलाठी ज्ञानेश्वर निमसटकर याला नगर परिषद शाळा क्रमांक 5 जवळील पोष्ट कॉलनीतील त्याच्या घरी एक हजार रुपयांची लाच घेताना पकडले. ही कारवाई अमरावती परिक्षेत्राचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, पोलीस उपअधीक्षक आर बी मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अस्मिता नगराळे, कर्मचारी शेषराव सोयाम, अनिल राजकुमार, भारत चिरडे, निलेश पखाले, मिलिंद गोफणे, किरण खेडकर, महेश वाकोडे, वसीम शेख, सचिन भोयर, राकेश सावसाकडे यवतमाळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे. लाच मागत असल्यास तक्रार करण्याचे आवाहन सुद्धा केले आहे.