तारेंद्र बोर्डे यांची भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी निवड, तरुण व ओबीसी चेह-याला संधी

निकेश जिलठे, वणी: भाजपने मिशन 2024 ला सुरूवात केली आहे. राज्यातील आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपने पक्ष संघटनेत मोठा बदल केला आहे. नुकतेच भाजपचे महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाध्यक्षांची नवी टीम जाहीर केली आहे. यात प्रस्थापितांना धक्का देत वणीचे तरुण व तडफदार नेते, माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांची जिल्हाध्यक्ष म्हणून निवड केली आहे. तारेंद्र बोर्डे यांच्या निवडीने एक ओबीसी तसेच तब्बल 25 वर्षांनंतर कुणबी समाजातील जिल्हाध्यक्ष मिळाला आहे. शिवाय यवतमाळ जिल्ह्यातील भाजपचा सर्वात तरुण जिल्हाध्यक्ष होण्याचा मान देखील त्यांना मिळाला आहे. त्यांच्या निवडीची बातमी येताच कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व गुलाल उधळून आपला आनंद व्यक्त केला.

नितीन भुतडा यांचा जिल्हाध्यक्षपदाचा कार्यकाळ पूर्ण झाला होता. नुकतीच त्यांची यवतमाळ-वाशिम जिल्हयाचा प्रचार प्रमुख म्हणून निवड करण्यात आली होती. नितीन भुतडा हे मुळचे उमरखेड येथील आहे. यवतमाळ जिल्ह्यातून राजू पडगिलवार, अमर दिनकर, रवि बेलूरकर, प्रवीण प्रजापती, अमोल ढोणे, अमन गावंडे, बाळासाहेब शिंदे व तारेंद्र बोर्डे यांचे नाव चर्चेत होते. या शर्यतीत तारेंद्र यांचे नाव पिछाडीवर होते. मात्र वणी नगरपालिकेतील त्यांच्या कामाचा धडाका, जिल्हा युवामोर्चाचे संघटनात्मक काम पाहून व पक्षाने आगामी निवडणूक लक्षात घेऊन तारेंद्र बोर्डे यांच्यावर विश्वास टाकला आहे.

विश्वास सार्थ करून दाखवणार – तारेंद्र बोर्डे
पक्षश्रेष्ठींनी माझ्यासारख्या तरुणावर जो विश्वास टाकला आहे तो सार्थकी लावण्याचा माझा अटोकाट प्रयत्न राहणार. जिल्ह्यातील विविध जाती-धर्मातील लोकांना एकत्र घेऊन पक्ष संघटन मजबूत करण्यावर माझा भर राहील. तसेच आगामी निडवणुकीत ज्या जागेवर भाजप नाही अशा ठिकाणी भाजपचा झेंडा रोवण्याचे माझे मिशन राहणार आहे.
– तारेंद्र बोर्डे, जिल्हाध्यक्ष भाजप

तारेंद्र यांचा थोडक्यात परिचय
तारेंद्र बोर्डे हे व्यावसायिक आहेत. महाविद्यालयीन जीवनापासून त्यांनी भाजप प्रणीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही संघटना जॉईन केली. 2000 साली त्यांना एबीवीपीचे नगरमंत्री हे पद मिळाले. 2006 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला. सुरुवातीला त्यांना भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष पद त्यांना देण्यात आले. त्यानंतर त्यांनी युवामोर्चाचे जिल्हाध्यक्ष भूषवले. दरम्यानच्या काळात त्यांनी तरुणांसाठी विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबवले. 2015 मध्ये वणी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला. युवकांसाठीचे कार्य बघून पक्षाने त्यांना भाजयुमोचे राज्य उपाध्यक्ष हे पद देखील दिले होते. 

भाजपचे मिशन 2024 व मिशन ओबीसी
2019 च्या विधानसभा निवडणुकीत पूर्व विदर्भात भाजपला मोठा फटका बसला होता. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने ओबीसी नेत्यांची जुळवाजुळव सुरू केली आहे. 2019 च्या निवडणुकीत तिकीट नाकारलेले चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे यांना पक्षाने मोठी जबाबदारी दिली. तर निवडणुकीत पराभव पत्कारावा लागलेले माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांना भाजपने त्यांची राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी निवड केली. तसेच चंद्रपूर जिल्ह्यात चांगला होल्ड असलेले डॉ. अशोक जिवतोडे यांना देखील भाजपने पक्षात घेतले आहे. यापुढे आणखी एक पाऊल पुढे जात भाजपने आता यवतमाळ जिल्ह्यातील भाजपचे नेतृत्त्व ओबीसी समाजातून येणा-या तारेंद्र बोर्डे यांच्याकडे दिले आहे.

यवतमाळ जिल्ह्यात वणी, राळेगाव, यवतमाळ, दिग्रस, आर्णी, पुसद व उमरखेड असे सात विधानसभा मतदारसंघ आहेत. यातील दिग्रस येथील जागा ही शिवसेना (शिंदे) गटाकडे तर पुसदची जागा ही राष्ट्रवादीकडे (अजित पवार गट) आहे. सध्या हे दोन्ही गट भाजपसोबत आहे. मात्र चंद्रपूर-वणी-आर्णी ही लोकसभेची जागा काँग्रेसकडे गेली होती. सध्या ही जागा खा. बाळू धानोरकर यांचे निधन झाल्याने रिक्त झाली आहे. या जागेवर विजय मिळवणे भाजपला अत्यंत गरजेचे आहे. वणी विधानसभा मतदारसंघ हा कुणबी बहुल मानला जातो. या परिसरात तारेंद्र बोर्डे यांचा चांगला जनसंपर्क आहे. शिवाय युवामोर्चाच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यात असलेल्या तारेंद्र यांच्या जनसंपर्काचा पक्षाला लोकसभेत चांगला फायदा होऊ शकतो. ही बाब डोळ्यासमोर ठेवून देखील ही नियुक्ती केल्याचे बोलले जात आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.