वणी तालुक्यातील शिक्षक वाबळेवाडीच्या अभ्यास दौऱ्यावर
न.प. व पं.सचे 53 शिक्षक अभ्यास दौ-यावर
वणी/मारेगाव प्रतिनिधी: पुणे जिल्ह्यातील वाबळेवाडी येथे अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय दर्जेदार नाविन्यपूर्ण जिल्हा परिषद शाळा आहे. वणी तालुक्यातील पंचायत समिती व नगर परिषद शाळेमध्ये कार्यरत 53 शिक्षक या शाळेचा अभ्यास करण्यासाठी शैक्षणिक अभ्यास दौऱ्यासाठी दि.1ऑगस्टला निघाले आहेत. या दौऱ्यात वणी पंचायत समिती व नगर पालिकेचे 50 तर पंचायत समिती मारेगाव येथील 1 व पंचायत समिती झरी येथील 3 शिक्षकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे हा दौरा स्वखर्चाने आणि स्वेच्छेने आयोजित करण्यात आलेला आहे.
जिल्हा परिषदेच्या या आंतरराष्ट्रीय शाळेत मोठ्या प्रमाणावर विविध उपक्रम राबविले जातात. त्यापैकी येथील विद्यार्थ्यांनाची पादत्राणे ठेवण्याची व्यवस्था, लोकसहभाग, आर्थिक विनियोग, अविष्कार प्रयोगशाळा, व्हर्च्युअल लर्निंग, साहसी खेळ, फाउंडेशन बॅच, विषय मित्र, एकात्मिक अभ्यास, बोटॅनिकल गार्डन, संगीत शिक्षण, वाचनालय, इनोव्हेशन बँक, झिरो एनर्जी स्कूल, साफ-सफाई नियोजन, टॅबलेट स्कूल, कोडींग, वर्ग रचना, एकविसाव्या शतकातील, कौशल्य संस्कृतिक कार्यक्रम, शालेय पोषण आहार, पूर्वप्राथमिक नियोजन, व्यवस्थापन समिती, गावचा सहभाग, स्पोकन इंग्रजी, स्पर्धापरीक्षा, मूल्य जागृती, पर्यावरण शिक्षण, मुलांकडे आर्थिक व्यवहार, समता समानता या विषयासंदर्भात या दौऱ्यातील शिक्षक या शाळेचा अभ्यास करून आपापल्या शाळा पूर्ण प्रगत करण्याच्या दृष्टीने काम करणार आहे.
संपूर्ण विदर्भात तालुका स्तरावरून एवढ्या मोठ्या प्रमाणावर शिक्षक अभ्यास दौऱ्यावर जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. हा अभ्यास दौरा शिक्षणाधिकारी डॉ.सुचिता पाटेकर यांच्या प्रेरणेने गटशिक्षणाधिकारी प्रकाश नगराळे यांच्या नेतृत्वात केंद्र प्रमुख लक्ष्मण इड्डे, गजानन कासावार, मंगेश खामनकर, अरविंद गांगुलवार, स्वप्नां पावडे इत्यादी 53 शिक्षक या दौऱ्यात सहभागी आहेत.