वणी तालुक्यातील शिक्षक परिवर्तनाच्या वाटेवर
अध्ययन निष्पत्ती पूर्ण करण्याच्या दिशेने पावले
बहुगुणी डेस्क, वणी: वणी पंचायत समितीमधील शिक्षकांनी शिक्षण क्षेत्रात समग्र परिवर्तनाचा ध्यास घेऊन गुणवत्तेत झेप घेण्यासाठी अध्ययन अध्यापनात बदल करून अध्ययन निष्पत्ती पूर्ण करण्याच्या दिशेने पावले टाकत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून वणी तालुक्यातील 69 शिक्षक पुणे तालुक्यातील अटल बिहारी वाजपेयी जिल्हा परिषद आंतरराष्ट्रीय नाविन्यपूर्ण शाळेच्या अभ्यासासाठी आज दि. 20 सप्टेंबरला रवाना झाले आहेत.
याआधी 2 ऑगस्टला जिल्हा परिषद व वणी नगर परिषदेतील 52 शिक्षकांनी या शाळेला भेट देऊन आपापल्या शाळेत नावीन्यपूर्ण उपक्रमांना सुरुवात केली आहे. त्या पासून प्रेरणा घेऊन वणी पंचायत समिती मधील गटशिक्षणाधिकारी प्रकाश नगराळे यांच्या नेतृत्वाखाली 69 शिक्षक, केंद्रप्रमुख व साधन व्यक्ती रवाना झाले आहेत. ते 21 सप्टेंबरला या आंतरराष्ट्रीय शाळेला भेट देणार आहेत. पूर्ण महाराष्ट्रात गुणवत्तेसाठी तेथील वारे व खैरे गुरुजींच्या परिश्रमाने ओळखल्या जात असलेल्या या शाळेत पारंपरिक पद्धत सोडून नाविन्यपूर्ण रितीने अध्ययन अध्यापन केले जाते. त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन आपापल्या स्तरावर असे प्रयोग करण्याची प्रेरणा घेण्यासाठी हे शिक्षक गेले आहेत.
या अभ्यास दौऱ्यानंतर या शिक्षकांचा गट तयार करून नाविण्यापूर्ण प्रयोग राबविण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे प्रकाश नगराळे यांनी सांगितले. या चमुमध्ये केंद्र प्रमुख राजेंद्र कोरडे, गट समन्वयक प्रकाश नागतुरे सहभागी आहेत.