मजूर नेणा-या टेम्पोचा भीषण अपघात, 1 महिला ठार

चारगाव येथील पुलाजवळ टेम्पो पलटी, 8 जण जखमी

विवेक तोटेवार, वणी: शिरपूर येथे महिला मजुरांना पोहोचवणा-या टेम्पोला भीषण अपघात झाला. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला तर 8 जण जखमी झालेत. सोमवारी दिनांक 3 फेब्रुवारी रोजी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. सुमन वासुदेव नागपुरे (55) रा. शिरपूर असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.

प्राप्त माहितीनुसार, शिरपूर येथून काही महिला ऑटोने पुरड (पुनवट) येथील एका शेतात कापूस वेचण्याच्या कामाला जातात. महिलांना गावातीलच एक ऑटोचालक नेहमी पुरड येथे घेऊ जातो. सोमवारी ऑटोचालकाला वणी येथे कापूस विकण्याचा असल्याने त्याने कापूस नेण्यासाठी गावातीलच टाटा एस (MH34 DG3997) हे वाहन भाड्याने केले. त्याने वणीत विकला व संध्याकाळी परत येताना तो टेम्पो घेऊन पुरड येथे गेला. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

काम संपल्यानंतर महिला मजूर टेम्पोत बसल्या. दरम्यान चारगाव येथील पुल क्रॉस केल्यानंतर बोढाडकर यांच्या शेताजवळ टेम्पोचालकाचे नियंत्रण सुटले व टेम्पो रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाला. या अपघातात सुमन यांच्या छातीला व डोक्याला जबर मार लागला. सर्व महिलांना शिरपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र सुमन यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

इतरांना जखमींना शिरपूर व वणी येथे उपचार करून सुटी देण्यात आली. रुचिता महेश बारसाकळे (35), वंदना सुधाकर वालकोंडे (55), छाया राजेश दरकंटीवार (45), मंगला राजू नागपुरे (40), पर्वता वसंता नागपुरे (50), वंदना राजू निब्रड (48), मंगला चंपत सुरतेकर असे जखमी महिलांचे नाव आहेत. यापैकी एका महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. तर चालक देखील जखमी झाला आहे. 

अपघात होताच शिरपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा केला. या प्रकरणी महेश विठ्ठल बारसाकळे (41) रा. शिरपूर यांनी पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी टेम्पो चालकावर बीएनएसच्या कलम 106 (1), 281, 125(A), 125 (B) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार माधव शिंदे यांच्या मार्गदर्शनात पोलिस करीत आहे. सुमन यांच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

साधनकर वाडीत 15 लाखांची जबर घरफोडी, रोख रकमेसह लाखोंचा ऐवज लंपास

Comments are closed.