तेंदूपत्ता मजुरांचे पैसे देण्यास ग्रामपंचायतची टाळाटाळ
दोन महिन्यापासून बोनस जमा न झाल्याने संताप
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील भेंडाळा येथील आदिवासी मजूर यांचे दोन महिन्यांपासून बोनसचे चेक मिळूनही पैसे खात्यात जमा करण्यात न आल्याने मजूर वर्गात संताप व्यक्त होत आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करणार असल्याची माहिती मिळाली आहे.
भेंडाळा येथील ४५ मजुरांचे बोनसचे चेक ३० जूनला सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समितीच्या नावाने दिला आहे. ही रक्कम ६६ हजार ५१० रुपये इतकी आहे. सदर चेक हा समितीच्या नावाने खाते उघडून जमा करणे आवश्यक होते. परंतु अजुनपर्यंत जमा न करता उलट मजुरांना उडवाउडवीची उत्तर देत असल्याचे आरोप मजुरांकडून होत आहे.
नियमाने तेंदूपत्ता आदिवासी मजुरांचे चेक अडविण्याचा अधिकार नाही. तसेच मे महिन्याच्या अखेरपर्यंत चेक बँक खात्यात जमा करणे गरजेचे असताना ग्रामपंचायतने हेतुपुरस्सर पैसे अडवले असा आरोप होत आहे. पावसाळा सुरू झाला असला तरी मजुरांना कोणतेही नसल्याने बोनसच पैसे मिळाले तर काही दिवस जगण्याचा आधार मिळेल अशी आशा मजूर वर्गात व्यक्त केली जात आहे.
मजुरांच्या चेक बाबत सरपंच लीनेश सातपुते यांना विचारणा केली असता चेक मिळाला असून काही मजुरांचे खाते काढण्यात आले नसल्याने तसेच चेक करेक्शन करिता वेळ लागला. २६ ऑगस्ट पर्यंत सर्व मजुरांच्या खात्यात त्यांचा बोनस जमा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली होती. परंतु बोनसचे पैसे मजुरांच्या खात्यात पैसे जमा न झाल्यामुळे अखेर सर्व मजूर जिल्हाधिकारी यांच्या कडे जाणार असल्याची भूमिका संतोष धांडे, श्यामराव आडे, यादव खाडे, संतोष भोसकर सह इतर मजुरांनी घेतली आहे.