अखेर बेपत्ता असलेल्या राजेंद्रचाही मृतदेह आढळला

सोनापूर नाल्याच्या पुलावरून सोमवारी रात्री दोघे गेले होते वाहून

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील राजूर-नांदेपेरा दरम्यान असलेल्या सोनापूर येथील सतीश मधूकर देठे (42) राजेंद्र उर्फ बालू नामदेव उईके (41) हे दोघे सोनापूर नाल्याच्या पुलावरून सोमवारी रात्री वाहून गेले होते. यातील सतीशचा सकाळी मृतदेह आढळला होता. त्यानंतर दुपारी 3 वाजेच्या दरम्यान राजेंद्रचाही मृतदेह आढळला आहे. एकाच दिवशी गावातील दोघांचा मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे.

सविस्तर वृत्त असे की सतीश मधूकर देठे व राजेंद्र उईके हे सोनापूर येथील रहिवाशी होते. सतीश हे वणीतील एका फायनान्स फर्ममध्ये काम करत होते. तर राजेंद्र हे शेतमजूर होते. सोनापूर गावाला लागूनच राजूर कॉलरी मार्गावर नाला आहे. त्या नाल्यावर पूल आहे. सोमवारी परिसरात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे सोनापूर नाल्याला पूर आला होता. हा नाला सखल भागात असल्याने मुसळधार पाऊस आल्यावर पुलावरून सुमारे 3 ते 4 फुट पाणी वाहते.

सोमवारी रात्री 8.30 वाजताच्या सुमारास सतीश व राजेंद्र हे कामानिमित्त राजूर येथे जात होते. मात्र पुलावर पाणी असल्याने त्यांनी त्यांची दुचाकी बाजूला लावली व ते त्यांनी पूल पार करण्याचा प्रयत्न केला. मात्र पुराच्या पाण्यात ते दोघेही वाहून गेले. रात्री दोघेही वाहून गेल्याची माहिती सोनापूर येथील ग्रामस्थांना मिळाली. तेव्हापासून त्यांची शोधमोहीम सुरू होती.

सकाळी पुराचे पाणी ओसरले. सोनापूर गावालगतच सुमारे 1 किलोमीटर अंतरावर सतीश यांचा मृतदेह आढळून आला. तर राजेंद्र बेपत्ता होता. घटनेची माहिती होताच वणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी राजेंद्रचा मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी पाठवला. दरम्यान गावातील लोक नाल्याच्या परिसरात बेपत्ता राजेंद्रचा शोध घेत होते. अखेर दुपारी राजेंद्रचाही मृतदेह पुलापासून 100 मीटर अंतरावर नाल्याच्या तिरावर आढळून आला.

राजेंद्र मृतदेह पोलिसांनी उत्तरिय तपासणीसाठी वणी येथे पाठवला आहे. एकाच दिवशी गावातील दोघांचा मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे.

हे देखील वाचा:

एसडीपीओ संजय पुज्जलवार यांच्या गाडीला अपघात

Comments are closed.