वणीतील कोर्टाला मिळणार नवीन सुसज्ज इमारत
आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या प्रयत्नातून 67 कोटींचा निधी
पुरुषोत्तम नवघरे, वणी: न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी 67 कोटी 35 लाख खर्चास शासनाकडून शुक्रवारी प्रशासकीय मान्यता मिळाली, अशी माहिती आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. शहराची वाढती लोकसंख्या बघता, गेल्या सात ते आठ वर्षांत न्यायालयीन कामकाजाची व्याप्ती आणि विस्तार वाढला आहे. त्यामुळे न्यायालयाला सध्याच्या इमारतीत जागा कमी पडत होती. ही अडचण दूर करण्यासाठी नवीन इमारत व्हावी, अशी मागणी वकील संघाने केली होती.
वणी येथे तीन कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय कार्यरत आहे. दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर प्रस्तावित आहे. मात्र अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय नसल्याने त्यासाठी वणी येथील वकील व पक्षकारांना पांढरकवडा व यवतमाळ न्यायालयात जावे लागत आहे. वणीत पुरेशा जागेअभावी न्यायालयीन कर्मचारी, वकील व पक्षकार सर्वांना जागेअभावी अडचण निर्माण झाली होती. पक्षकारांचीसुद्धा गैरसोय होते. जास्त गर्दी झाल्यामुळे बाहेर त्यांना ताटकळत उभे राहावे लागते.
कोर्ट हॉल लहान असल्याने वकिलांना बसण्याचीपण गैरसोय होते. आता या सर्व अडचणी दूर होऊन नवीन सहा मजली इमारतीमध्ये आता प्रशस्त सहा कोर्ट हॉल व कार्यालय होणार असल्याने वकील, पक्षकार व कर्मचाऱ्यांची अडचण दूर होणार आहे.
पंचायत समिती व तहसीलच्या इमारतीसाठी लवकरच निधी
नवीन इमारतीत न्यायालयीन इमारत, अंतर्गत रस्ते, वाहन पार्किंग, लँड स्केपिंग, पाणीपुरवठा, स्वच्छतागृह, वॉल कम्पाउंड इत्यादी सोयी-सुविधा होणार असून, न्यायालयाचे या नवीन इमारतीमुळे वणी शहराचे वैभवातही भर पडणार आहे. तसेच लवकरच पंचायत समिती व तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीसाठी पाठपुरावा सुरू असून त्यासाठी लवकरच निधी उपलब्ध होणार आहे.
– आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार
मूळ इमारतीसाठी 37 कोटी 24 लाख रुपये, अंतर्गत व बाह्य विद्युतीकरणासाठी 4 कोटी 9 लाख रुपये, पाणी पुरवठा व स्वच्छतागृह 1 कोटी 86 लाख रुपये, फर्निचरसाठी 4 कोटी 18 लाख रुपये, लिफ्टसाठी 1 कोटी, सी.सी. ड्रेन, सी.सी. वर्क साठी 90 लाख रुपये, संरक्षक भिंतीसाठी 84 लाख रुपये व इतर खर्च मिळून 67 कोटी 35 लाख रुपये या न्यायालयाच्या इमारतीसाठी मिळाले आहेत.
Comments are closed.