विवेक तोटेवार, वणी: आज शनिवारी दुपारी 4 वाजताच्या दरम्यान जत्रा रोड परिसरात क्रेन उलटल्याने एकच खळबळ उडाली. ही क्रेन विद्युत तारांच्या मध्ये येणारे झाड तोडण्यासाठी आली होती. मात्र काम सुरू असतानाच हा अपघात झाला. यात झाडाची फांदी एका घरावर कोसळ्याने त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
काळाराम मंदिर परिसरात प्रवीण रामावत यांचे घर आहे. त्यांच्या घराच्या बाजुला एक पिंपळाचे झाड आहे. हे झाड जिर्ण झाल्यामुळे तसेच या झाडांच्या फांद्यांमधून इलेक्ट्रिक तार गेल्याने शॉर्टसर्किटचा धोका होता. तसेच जिर्ण झालेले झाड घरावर पडून अपघाताची शक्यताही होती. त्यामुळे त्यांनी नगर परिषद कडे झाड कापण्याची परवानगी मागितली होती.
आज याच परिसरात डॉ. मत्ते यांच्या घराजवळ नवीन पोल बसवण्याचे काम सुरू करण्यात येणार होते. त्यासाठी लाईट बंद करावी लागते. त्यामुळे याच कामात काम म्हणून झाड कापण्यासाठी क्रेनही बोलवण्यात आली. दुपारी 12 वाजताच्या दरम्यान क्रेनद्वारा झाडाच्या फांद्या तोडण्याचे काम सुरू झाले. दुपारी चार वाजताच्या दरम्याने कामाच्या शेवटच्या टप्प्यात एक वजनदार फांदी क्रेनने तोडली. मात्र फांदीचा भार अधिक झाल्याने क्रेनचे बॅलन्स गेले व क्रेन शेजारी असलेल्या प्रवीण रामावत यांच्या घरावर उलटली. यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तर रामावत यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. क्रेन उलटताच या परिसरात बघ्यांची एकच गर्दी जमली होती.
10 वाजेपासून लाईट बंद असल्याने नागरिक त्रस्त
पोल बसवण्यासाठी लाईट बंद करण्यात आली. लाईट बंद असल्याने झाड तोडण्याचा निर्णय़ घेण्यात आला. परिसरातील लाईट स. 10 ते 1 पर्यंत बंद राहिल असा मॅसेज परिसरातील लोकांच्या मोबाईलवर आला. मात्र 6 वाजून गेले तरी अद्यापही लाईट आली नव्हती. विद्युत वितरण कंपनीचे अभियंता जिद्दलवर यांनी सदर परिसरातील 3 डीपी बंद असल्याची माहिती दिली. मात्र लाईट सकाळपासून बंद असल्याने नागरिकांना आज संपूर्ण दिवस त्रास सहन करावा लागला.