जितेंद्र कोठारी, वणी : मागील 4 दिवसांपासून बेपत्ता असलेले शिक्षक अजय विधाते यांचा अखेर मृतदेहच आढळला. गोंडपिंपरी तालुक्यातील पोडसा नदी पात्रात लाठी गावाजवळ रविवारी सकाळी त्यांचा मृतदेह मिळून आला. येथील जैन कॉलनीतील रहिवासी आणि कोरपना पंचायत समिती अंतर्गत कोडसी (खु.) येथील जि. प. शाळेत शिक्षक असलेले अजय विधाते 19 जुलै पासुन बेपत्ता होते.
अजय विधाते 19 जुलै रोजी सकाळी घरून दुचाकी घेऊन निघाले होते. मात्र बराच वेळ उलटूनही परत घरी न आल्यामुळे कुटुंबीयांनी शोध घेतले असता त्यांची दुचाकी वणी वरोरा मार्गावरील वर्धा नदीच्या पाटाळा पुलावर आढळली. यवतमाळ जिल्ह्यात सततच्या पावसामुळे वर्धा नदी दुथडी भरून वाहत आहे. काही तरी अनुचित प्रकार घडल्याची शंका येऊन कुटुंबीयांनी वणी पोलीस ठाण्यात माहिती दिली. वणीचे ठाणेदार पोनि अजित जाधव यांनी तात्काळ पाटाळा पुलावर जाऊन पाहणी केली. तसेच महसूल विभागाला याबाबत सूचना देऊन नदी पात्रात शोध मोहीम सुरु केली.
मागील 4 दिवसांपासून बोटीच्या मदतीने वर्धा नदी पात्रात तसेच नदी खोऱ्यात दिवसरात्र शोध घेऊनही त्यांचा काही पत्ता लागला नव्हता. अखेर रविवारी सकाळी चंद्रपूर जिल्ह्यात गोंडपिंपरी तालुक्यातून वाहणारी पोडसा नदीत लाठी गावाजवळ अजय विधाते (39) रा. जैन कॉलोनी वणी यांचा मृतदेह नागरिकांना आढळला. गोंडपिंपरी पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवून वणी पोलिसांना याबाबत कळविले आहे. मृतदेह मिळाल्याची माहिती मिळताच मृतक अजय विधाते यांचे कुटुंबीय गोंडपिंपरी येथे जाण्यासाठी निघाल्याची माहिती आहे .
दुर्घटना की आत्महत्या ?
मृतक अजय विधाते यांची मोटरसायकल वर्धा नदीच्या पुलावर आढळली. त्यामुळे अनुचित घटना घडल्याचा संशय बळावला होता. मात्र अजय विधाते यांनी दुचाकी ठेवून वर्धा नदीत उडी घेतली की तोल जाऊन नदीत पडले. हे अद्याप स्पष्ट झाले नाही. त्यांनी आत्महत्याच्या उद्देशाने नदीत उडी घेऊन जीवन संपविले असेल तर त्यांच्या आत्महत्याचे मागे नेमके कारण काय? हे पोलिसांना तपासणे गरजेचे आहे.
मृतदेहाचा 250 किमीचा प्रवास ..!
मागील 4 दिवसांपासून मुसळधार पावसामुळे वर्धा नदी दुथडी भरुन वाहत आहे. पाण्याच्या वेगवान प्रवाहात अजय विधाते यांचा मृतदेह 96 तासात पाटाळा येथून गोंडपिंपरी पर्यंत तब्बल 250 किलोमिटर पर्यंत वाहून गेला होता.
Comments are closed.