तालुका प्रतिनिधी, वणी: तालुक्यातील मेंढोली येथील एका शेतगड्याला सर्पदंश झाल्याची घटना दि. 7 सोमवारी दुपारी घडली. बाबाराव बापूराव कुटारकार (57) असे सर्पदंश झालेल्या शेतगड्याचे नाव आहे.
वणी तालुक्यातील मेंढोली येथील शेतकरी जनार्दन बालाजी कुचनकार यांच्याकडे बाबाराव शेतगडी म्हणून कामाला आहे. दुपारी शेतात मशागतीच काम करीत असताना सर्पदंश झाला. शेतमालकाने त्वरीत वणीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. बाबारावची प्रकृती स्थिर असून उपचार सुरू आहे.
मेंढोली येथील ही सर्पदंशाची दुसरी घटना
दि. 6 रविवारी सायंकाळी मुयर पुरुषोत्तम कावडे (22) याला सर्पदंश झाला होता. मयूर कावडे आणि राजू चिकराम दोघे मित्र दुचाकीने गावाला जाताना वरझडी रस्त्यावरील नाल्याजवळ थांबले. यावेळी मयूर शौचास जात असताना त्याच्या पायाला सर्पदंश झाला होता. ग्रामीण रुग्णालयात उपचारानंतर त्याला सुट्टी देण्यात आली.
वातावरणात उष्णतेच प्रमाण वाढत आहे. उकाड्याने सरपटणारे प्राणी ओलावा असणाऱ्या ठिकाणी आसरा घेऊन राहतात. अशा परिसरात वावरताना काळजी घेण्याची गरज आहे.
काय घ्यावी काळजी?*
शासनाच्या सर्वेनुसार सर्पदंशाच्या 88 टक्के घटना ग्रामीण भागात होतात. त्यामुळे ग्रामीण भागातील व्यक्तींनी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. चावणारा साप बिनविषारी असेल तर दातांच्या खुणा अर्धवर्तुळाकार रचनेत असतात. एक किंवा दोन दातांच्या खुणा असतील तर मात्र विषारी असण्याचा संभव असतो. कारण विषारी सापांचे विषारी दात हे इतर सापांच्या दातांपेक्षा लांब व तीक्ष्ण असतात. त्यामुळे विषारी दातांच्याच एक-दोन खुणा होतात.
सर्पविषाच्या इतर परिणामांचे स्वरूप हे सापाच्या जातीवर अवलंबून असते. किती विष शरीरात टोचले गेले आहे यावर परिणाम किती वेळाने व वेगाने होतात ते अवलंबून असते. नाग, मण्यार ह्यांचे विष चेतासंस्थेवर तर फुरसे, घोणस यांचे विष रक्तावर बाधक असल्याने दोन्ही गटांची लक्षणे व चिन्हे वेगवेगळी असतात.
मण्यार, नाग यांच्या दंशानंतर अर्ध्या तासात किंवा त्याहून लवकर लक्षणे व चिन्हे दिसायला लागतात. मात्र चावून पंधरा तास गेले तरी काहीच परिणाम होत नसल्यास,सर्पदंश झाला असेल पण विष नाही, असा त्याचा अर्थ काढता येईल.
घोणस, फुरसे यांच्या दंशानंतर कमीअधिक वेळात रक्तस्राव चालू होतो. नाग-मण्यार यांच्या तुलनेने मात्र जास्त वेळ लागतो. फुरशाचे विष कमी असल्यामुळे जास्त वेळ लागतो. पण सुमारे दोन तास ते चोवीस तासांपर्यंत कधीही चिन्हे व लक्षणे दिसू लागतात.
* (साभार विकासपीडिया)