जितेंद्र कोठारी, वणी: कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लागू करण्यात आलेले कडक निर्बंध बुधवार 2 जून पासून शिथील करण्यात आले. निर्बंध शिथील होताच वणीत ग्राहकांच्या गर्दीने बाजारपेठ फुलल्याचे चित्र बघायला मिळाले. अत्यावश्यक सेवेत समाविष्ट नसलेली दुकानांची शटर तब्बल दीड महिन्यानंतर उघडल्याने व्यापारीवर्ग सुखावले आहे. दरम्यान, कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी धोका अजून टळलेला नसल्याने नागरिकांसह व्यापाऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
वणी शहरातील गांधी चौक स्थित बाजारपेठेत विविध वस्तू व साहित्य खरेदीसाठी नागरिकांनी हजेरी लावली. अनेक ठिकाणी नियम पाळून खरेदी विक्री सुरू होती तर काही ठिकाणी गर्दी झाल्याने फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न झाल्याचे पाहावयास मिळाले. गेल्या अनेक दिवसांपासून अनेक व्यापा-यांना अर्धे शटर करून लपून छपून विक्री करावी लागत होती. मा्त्र आज अधिकृतरि्त्या दुकाने उघडण्यास परवानगी मिळाल्याचा आनंद व्यापा-यांच्या चेह-यावर दिसून येत होता.
शेतीविषयक साहित्याची खरेदीची गर्दी
तालुक्यात काही ठिकाणी मंगळवारी सायंकाळी व बुधवार सकाळी तुरळक पाऊस पडला. पावसाचे आगमन होताच ग्रामीण भागात शेतीविषयक कामे जोर धरू लागली आहे. बुधवारी शहरातील कृषी साहित्य विक्रीच्या दुकानात बि बियाणे, खत खरेदीसाठी शेतकऱ्यांनी गर्दी केल्याचे चित्र दिसत होते.
निर्बंध शिथिल झाले असले तरी कोरोनाचा धोका अजून संपलेला नाही. त्यामुळे बाजारपेठ, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करून पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढविण्यास हातभार लागणार नाही, याची खबरदारी प्रत्येकाने घेणे आवश्यक ठरत आहे. जीवनावश्यक व अन्य वस्तू, साहित्याची खरेदी करणे आवश्यकच आहे. परंतु बेजबाबदार वागणुकीतून कोरोना संसर्ग तर वाढणार नाही ना? याचे भान ठेवणेही गरजेचे आहे. दरम्यान प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्यात 13 एप्रिल रोजी रात्री ८ वाजेपासून पुन्हा निर्बंध कठोर करण्यात आले. मास्क, सोशल डिस्टनसिंग व रात्रीच्या संचारबंदीसह अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता उर्वरित दुकाने बंद ठेवण्याचे आदेश शासनाने दिले. शासनाने 15 मे पर्यंत निर्बंध लागू केले होते मात्र लसीकरण व रुग्ण संख्या लक्षात घेता 1 जुन पर्यंत निर्बंध वाढविण्यात आले होते.
कडक निर्बंधांचे चांगले परिणाम दिसून आले असून जिल्ह्यात कोरोनाचा आलेख खाली आला. पॉझिटिव्हिटी रेटही 3.5 टक्क्यांपर्यंत निचांकी आला. यामुळे 2 जूनपासून अत्यावश्यक सेवेसह मॉल व शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील दुकाने वगळता इतर दुकानांनाही सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा मिळाली.
हे देखील वाचा: