धान्याची उचल केली नसतानाही ऑनलाईन उचल केल्याची नोंद
अंगठा लावून दुकानदाराने उचलले धान्य, ग्राहकांचा आरोप
विवेक तोटेवार, वणी: अगोदर ग्राहकांचा अंगठा घेऊन रेशनच्या दुकानावर धान्य दिले जात होते. परंतु आता कोरोना विषाणूचा संसर्गामुळे एकाच मशीनवर अनेकांचा अंगठा लागत असल्याने दुकानदारांना स्वतःचा अंगठा लावून धान्य देण्याची परवानगी प्रशासनाने दिली आहे. परंतु वणीत या सुविधेचा दुकानदार गैरफायदा घेताना दिसत आहे. अऩेकांनी धान्य उचलले नसतानाही त्यांच्या नावावर धान्य उचलले गेल्याचे समोर आले आहे. त्यामुळे दुकानदार स्वतःच अंगठा घेऊन परस्पर मालाची उचल करीत असल्याचा आरोप अनेक ग्राहक करीत आहे.
वणीतील दिपक टॉकिजजवळ संगीत मोरस्कर यांचे रेशनचे दुकान आहे. किसनबाई पांडुरंग असमावार हे तेथील ग्राहक आहेत. त्यांनी मार्च व एप्रिल महिन्यात कोणत्याही प्रकारचे धान्य उचलले नाही. धान्य उचलले नसतानाही ऑनलाईन धान्याची उचल दाखवत असल्याने त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. तसेच दिलीप सखाराम मेश्राम याना 2 महिन्यात 10 किलोच धान्य देण्यात आले. त्यांना 40 किलो धान्य मिळावयास हवे होते. परंतु ऑनलाइन वर त्यांनी धान्य उचल केल्याचे दिसून येत आहे. या धान्याची स्वत:चा अंगठा लावून दुकानदाराने उचल केल्याचा आरोप या कार्डधारकांनी केला आहे.
या गंभीर प्रकाराबाबतची तक्रार नगरसेवक विजय रमेश मेश्राम हे उपविभागीय अधिकारी यांच्याकडे लवकरच करणार असल्याची माहिती त्यांनी वणी बहुगुणीशी बोलताना दिली. आता हा तांत्रिक घोळ आहे की यात दुकानदाराने चलाखी केली आहे. हे तपासाअंती कळून येईल. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.
बघा काय म्हणत आहेत ग्राहक आणि नगरसेवक…