सुशील ओझा, झरी: कोरोना विषाणूचा प्रकोप टाळण्याकरिता बाहेर राज्यातील किंवा जिल्ह्यातील आलेल्या व्यक्तीला 14 दिवसांकरिता होम कॉरेन्टाईऩ किंवा जिल्हापरिषद शाळेतील विलगीकरण कक्षात ठेवले जात आहे. मात्र या विलगीकरण कक्षात साप निघाल्याने एकच खळबळ उडाली असून लोकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
गणेशपूर येथील एक तरुण बेंगलोर येथून 1 जूनला आपल्या राहत्या घरी गणेशपूर येथे आला. गावी परतताच त्याने आपली वैद्यकीय तपासणी केली. नियमाप्रमाणे त्याला गणेशपूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या एका खोलीत 14 दिवसांकरिता कॉरेन्टाईन करण्यात आले.
गेल्या 4 दिवसांपासून सतत दिवसभर व रात्री वीजेचा खेळखंडोबा सुरू असल्याने सदर तरुण त्रस्त झाला. त्यातच 6 जून रोजी रात्री 8 वाजता दरम्यान कक्षात चक्क साप शिरल्याने सदर मुलाची चांगलीच भांबेरी उडाली. साप निघाल्याने कक्षातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे झाले आहे. याबाबत मुलाचे वडील व मामाने पोलीस स्टेशन गाठून तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या नावाने तक्रार दिली आहे.
विलगीकरण कक्षात असलेल्या शौचालयाची साफसफाई नाही, शाळेच्या आजूबाजूला कचरा आहे, आंघोळीच्या पाण्याची नीट व्यवस्था नाही त्यामुळे सदर तरुण त्रस्त झाला होता. त्यातच लाईटचाही खेळखंडोबा सुरू असतो. याची चौकशी करून उपाययोजना करावी असे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. याची प्रत पोलीस पाटील, सरपंच व पोलीस स्टेशनला देण्यात आली.
तालुका पातळीवर दक्षता समिती तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली आहे त्यात गटविकास अधिकारी, ठाणेदार, तालुका वैद्यकीय अधिकारी इतर अधिकारी असतात. ग्राम पातळीवर ग्रामदक्षता समिती आहे. त्यातही सरपंच पोलीस पाटील, सचिव तलाठी व इतर लोक असतात. मग विलगीकरन असलेल्या व्यक्तींच्या सुरक्षेची जवाबदारी कुणाची असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सदर युवकाने व त्याच्या नातेवाईकांनी होम कॉरेन्टाईन करण्याची वारंवार विनंती केली आहे. परंतु त्याला शाळेतच राहण्याचे आदेश दिले आहे. 5 दिवसापासून कोणत्याही सुविधा विलगिकरन कक्षात नसल्याची तक्रार केली असून त्याची दखल घेणार काय ? त्याच्या सुरक्षेकरिता उपाययोजना करणार काय असाही प्रश्न उपस्थित होत आहे.