ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगावात ग्रामीण रुग्णालयातील विविध समस्येसाठी मनसेच्या कार्यकत्यांचं आमरण उपोषण सुरू आहे. उपोषणाकडे प्रशासनानं दुर्लक्ष केल्यानं आता उपोषणकर्त्यांनी आंदोलन तीव्र केलं आहे. शुक्रवारी उपोषणकर्त्यांनी आमदारांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध नोंदवला आहे. दरम्यान एका उपोषणकर्त्यांची प्रकृती बिघडल्यानं त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
मारेगाव शहरातील मार्डी चौकामध्ये ग्रामीण रुग्णालयातील रिक्त जागा भरून रुग्णांना योग्य सेवा द्यावी या मागणीसाठी बुधवारपासून आमरण उपोषण सुरु आहे. आज उपोषणाचा तीसरा दिवस उजाळला पण प्रशासनाला काही जाग आली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी वणी विधानसभेचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध व्यक्त केला. दरम्यान उपोषणामध्ये सामिल असलेले कार्यकर्ते रमेश सोनुले यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना उपचारासाठी स्थानिक ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
आमदारांच्या निष्क्रिय कार्यशैलीमुळे ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सेवा धेपाळली. त्यामुळे मनसे लोकांना चांगली आरोग्य सेवा मिळावी यासाठी रस्त्यावर उतरली आहे. मागणी पूर्ण होईपर्यंत आम्ही उपोषणावर ठाम राहू. जर प्रशासनानं या प्रकरणी दुर्लक्ष केलं तर आम्ही मनसे स्टाईल आंदोलन तीव्र करू.
– राजू उंबरकर, राज्य उपाध्यक्ष, मनसे
गेल्या दीड वर्षा पासून मारेगाव ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी यांचे सह अनेक पदं रिक्त आहे. रुग्णालयातील आरोग्य सेवेचे तीन तेरा वाजले आहे. यासंबंधी काही दिवसांपूर्वी मनसेनं निवेदन दिलं होतं. पण त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे मनसेनं उपोषणाचं हत्यार उपसलं.
(नुकसानग्रस्त शेतक-याला नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ)
उपोषणाच्या दुसऱ्या दिवसी जिल्हा शल्य चिकित्सक टी जी धोते यांनी भेट दिली. पण यातून काहीही निष्पन्न झालं नाही. वृत्त लिहण्यापर्यंत पुतळा जाळणा-या कोणत्याही कार्यकर्त्यांवर पोलिसांनी कारवाई केलेली नाही.