पाहुणा लघूशंकेला गेला, परत आल्यावर दुचाकी गायब

दुचाकी चोरांचा उच्छाद... लघवीला उतरणे पडले चांगलाच महागात

बहुगुणी डेस्क, वणी: दुचाकी रस्त्याच्या कडेला लावून लघूशंकेला जाणे एका बाहेरगावच्या पाहुण्याला चांगलेच महागात पडले. अवघ्या काही वेळातच चोरट्याने बाहेरगावच्या पाहुण्याची दुचाकी लंपास केली. मारेगाव येथे वणी रोडवर ही घटना घडली. याबाबत मारेगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिसरात दुचाकी चोरांनी नुसता उच्छाद मांडला आहे. यात सर्वसामान्य चांगलाच भरडला जात आहे.

सविस्तर वृत्त असे की विशाल प्रमोदराव कडू (29) हा हिंगणघाट येथील रहिवासी आहे. तो हिंगणघाट येथील एका दालमीलमध्ये काम करतो. त्याच्याकडे होन्डा ड्रिम युगा ही दुचाकी (MH 32 AN1371 किंमत 40 हजार रुपये) आहे. 5 जानेवारीला तो कामानिमित्त मारेगाव येथे त्याच्या दुचाकीने आला होता. संध्याकाळी 6.30 वाजताच्या सुमारास त्याने मारेगाव-वणी रोडवरील इंडियन ऑईल कंपनीच्या पेट्रोल पम्पच्या बाजूला रस्त्यावर दुचाकी लावली व तो लघूशंका करायला गेला.

परत आल्यावर त्याला दुचाकी ठेवलेल्या ठिकाणी आढळून आली नाही. त्याने आजूबाजूला विचारणा केली. तसेच बस स्टॉप परिसरात जाऊन शोध घेतला मात्र दुचाकीचा काहीही पत्ता लागला नाही. तेव्हापासून तो दुचाकीचा शोध घेत होता. अखेर सोमवारी त्याने मारेगाव पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात भादंविच्या कलम 379 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

थ्री इडियटमधला चौथा इडियट ओमी वैद्य आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला

Comments are closed.