विवेक तोटेवार, वणी: मुलीच्या लग्नासाठी बाहेरगावी गेले असलेल्या एका कुटुंबीयांच्या घरी घरफोडी झाली. राजूर येथे गुरुवारी दिनांक 15 जुलै रोजी ही घटना उघडकीस आली. या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे 50 हजारांचे सोने, चांदी व रोख रक्कम पळवली आहे. याबाबत वणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे की फिर्यादी साहेब सिंग फत्ते बहादूर सिंग (60) हे राजूर येथील रहिवाशी आहे. ते सेवानिवृत्त वेकोलि कर्मचारी आहे. त्यांच्या मुलीचे 25 एप्रिल रोजी पनवेल जिल्हा रायगड येथे लग्न होते. त्यामुळे लग्नाच्या चार दिवस आधी दिनांक 21 एप्रिलला ते पनवेल येथे गेले होते.
दरम्यान कोरोनामुळे त्यांना लग्नाची तारीख पुढे ढकलावी लागली. त्यानंतर 24 जून ही लग्नाची तारीख ठरवण्यात आली. लग्न निर्विघ्न पार पडले. मात्र त्यानंतर त्यांनी कुटुंबीयांसह पनवेल येथेच थांबण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी 15 जुलै रोजी साहेब सिंग यांना शेजा-यांचा कॉल आला व त्यांनी सांगितले की त्यांच्या घराचा मागचा दरवाजा उघडा आहे.
घरफोडीची माहिती मिळताच त्याच दिवशी ते पनवेल येथून निघाले. आज दिनांक 16 जुलै रोजी ते राजूर येथे घरी पोहोचले. त्यांनी घरात जाऊन बघितले असता त्यांना अलमारीचे लॉक तोडून त्यातून चोरट्यांनी सोन्याचे दागिणे, चांदी व नगदी रुपये चोरून नेल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने वणी पोलीस स्टेशन गाठले व या घरफोडीबाबत तक्रार दाखल केली.
या घरफोडीत चोरट्यांनी सोन्याचे दागिणे, चांदी व रोख रक्कम पकडून एकूण सुमारे 50 हजारांचा डल्ला मारलाये. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरोधात भादंविच्या कलम 457, 380 नुसार गुन्हा दाखल कऱण्यात आला. घटनेचा तपास पोउनि शिवाजी टिपुर्ने करीत आहे.
हे देखील वाचा:
वंचितमधली अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, 20 पदाधिका-यांचे सामुहिक राजीनामे