तालुका प्रतिनिधी, वणी: चोरांनी खूप हुशारी दाखवली. कोणताच पुरावा किंवा क्लू मिळणार नाही याची काळजी घेतली. तरीदेखील पोलिसांनी आपले कौशल्य दाखवले. तीन चोरट्यांच्या मुसक्या आवळल्यात. येथील एका महिला बचतगट कार्यालयात चोरी झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीना ताब्यात घेतले. सदर चोरी प्रकरणी जेरबंद केलेल्या तीनही आरोपींना पोलिसांनी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने सर्व आरोपींची जिल्हा कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले. यामुळे वणी शहरातील अन्य चोरी प्रकरणाचा छळा लावण्यास पोलिसांना मदत होणार आहे.
वणी शहरातील एस पी एम शाळेजवळच्या महिला बचत गटाच्या कार्यालयात दि. 12 सप्टेंबर शनिवारी दुपारच्या दरम्यान चोरी झाली होती. यात इलेक्ट्रॉनिक साहित्य चोरी गेल्याची तक्रार रवींद्र चंद्रभान आत्राम (30) यांनी 18 सप्टेंबरला वणी पोलिसात नोंदवली. डिबी पथकाने योग्य दिशेने तपासाची चक्र फिरवीत सदर चोरी प्रकरणातील आरोपींना अटक केली.
महेश संजय नेरकुंटलावार (19), हरीश उर्फ टिक्का संजय रायपुरे (19) दोघेही रा. दामले फैल आणि संकेत संगम खोब्रागडे (20) रा. भीमनगर वणी अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर भा.दं.वि.च्या कलम 461, 380 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींकडून बुस्टर कंपनीचे दोन साऊंड बॉक्स, एक माईक असा एकूण 19 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक आणि ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल फिटिंग, डिबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव, सुधीर पांडे, सुनील खंडागळें, रत्नपाल मोहाडे, अमित पोयाम यांनी केली.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)