विवेक तोटेवार, वणी: शहरातील एमआयडीसी परिसरात असलेल्या जीएस ऑईल मिल येथे सुमारे 11 कोटी रुपयांचे भंगार चोरी प्रकरणी आरोपी शेख ईफ्तेखार उर्फ बबलु शेख अहमद (49) याला त्याच्या राहत्या घरी मोमिनपुरा येथून सोमवारी अटक करण्यात आली होती. आज बबलुला न्यायायलात हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गेल्या आठवड्यात भंगार चोरी प्रकरणी सिंकदराबाद येथील बँकेच्या व्यवस्थापकांनी वणीत येऊन गुन्हा दाखल केला होता. विशेष म्हणजे चोरट्यांनी दिवसाधवळ्या संपूर्ण फॅक्टरीतील सर्व वस्तू व साहित्य लंपास केले असून आता केवळ या फॅक्टरीचा विटांचा सांगाडा शिल्लक आहे.
एमआयडीसी परिसरात जीएस ऑईल मिल ही फॅक्टरी होती. या फॅक्टरीच्या संचालक मंडळाने आदिलाबाद येथील स्टेट बँक ऑफ इंडीयाच्या शाखेतून सुमारे 220 कोटी 95 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. परंतु 11 जुलै 2012 पासुन या कंपनीच्या व्यवस्थापक मंडळाने नियमीत कर्जाची फेड न केल्याने बँकेने फॅक्टरी ताब्यात घेतली होती. परिणामी फॅक्टरी बंद झाली. गेल्या 3-4 वर्षांपासून ही फॅक्टरी बंद अवस्थेत आहे.
शेख ईफ्तेखार उर्फ बबलु शेख अहमद (49) राहणार मोमिनपुरा वणी याचे मोमिनपुरा परिसरात भंगारचे दुकान आहे. बबलूने याचाच फायदा घेत इथले भंगार लंपास करायला सुरूवात केल्याचा आरोप आहे. गॅस कटर सारखे अत्याधुनिक मशिनच्या साहाय्याने चोरट्यांनी या फॅक्टरीतील भंगार दिवसाधवळ्या चोरून नेले. या भंगार चोरीबाबत वणी बहुगुणीनेही अनेकदा वृत्तही प्रकाशित केले होते.
दिनांक 9 फेब्रुवारी 2017 ते 10 मार्च 2018 पर्यंत फॅक्टरीतील सुमारे 11 कोटी 23 लाख 99 हजार रुपयांचे भंगार चोरट्यांनी लंपास केले. सध्या या फॅक्टरीचा केवळ सांगाडा शिल्लक आहे. या चोरीची माहिती कंपनीच्या संचालक मंडळास मिळाल्यावर त्यांनी बँकेला याबाबत माहिती दिली. दि. 2 जानेवारी रोजी सिकंदराबाद येथील स्टेट बँक आँफ इंडीयाचे व्यवस्थापक राधाक्रुष्ण मुक्कटीश्वरराव संका (55)यांनी वणी पोलीस ठाणे गाठुन साहित्य चोरी प्रकरणी तक्रार दाखल केली होती.
या तक्रारीवरुन वणी पोलीसांनी अज्ञात आरोपीविरोदात भादंविच्या कलम 379, 380, 452, 457, 34 अन्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी पोलिसांनी सोमवारी संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास मुख्य सुत्रधार शेख ईफ्तेखार उर्फ बबलु शेख अहमद (49) याला त्याच्या घरून अटक केली. आज त्याला न्यायालयात दाखल केले असता आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणी मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता शहरात आहे.
सदर कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात व पोलिस निरीक्षक वैभव जाधव यांच्या नेतृत्वात पोऊनि गोपाल जाधव, सुनिल खंडागळे, सुधीर पांडे, रत्नपाल मोहाडे, पंकज उंबरकर, दिपक वांड्रसवार यांनी केली.
हे देखील वाचा: