रेती तस्करी ‘रंगा’त…. तस्कारांनी शोधली नवीन क्ल्रुप्ती

दोन छोटा हत्ती जप्त, तिघांना अटक

0

विवेक तोटेवार, वणी: असं म्हणतात गरज ही शोधाची जनणी आहे. यातूनच नवनवीन शोध लागले गेले. हे सर्व शोध वैध कामांसाठी होते असे नाही. त्यातच जुने फंडे माहिती असल्याने तस्कर देखील आता नवनवीन शोध लावून तस्करी करत आहे. बुधवार असाच एक प्रकार वणीत समोर आला. 8 जुलै रोजी चक्क टाटा एस गाडीचा वापर रेती तस्करीसाठी करण्यात आल्याचे समोर आले. त्यामुळे रेती तस्करी किती ‘रंगा’त आलीये हे वणीकरांना दिसून आले. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून डीबी पथक व महसूल विभाग यांनी ही संयुक्त कारवाई केली.

दुपारी 1 वाजताच्या सुमारास हमीद चौकाजवळ अवैधरीत्या रेती वाहून नेणा-या दोन टाटा एस गाडी जप्त करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत रेती तस्कर हे टिप्पर, हायवा व ट्रॅक्टराच्या माध्यमातून रेती तस्करी करीत होते. मात्र आता हे साधनं थोडे रिस्की होत असल्याने तस्कराने आता नवीन शक्कल लढवत चक्क छोटे मालवाहक टाटा एस वाहनातून रेती तस्करी सुरू केली आहे. तसेच तीन चाकी ऍपे वाहणातूनही रेती तस्करी केल्या जात आहे. याबाबत एका सुजाण नागरिकाने महसूल विभागाच्या एका बड्या अधिकाऱ्याला माहितीही दिली होती. परंतु यांच्यावर कारवाई करण्यात महसूल विभागाला यश मिळाले नाही.

बुधवारी दुपारी डीबी पथकाला या रेती तस्करांबाबत गुप्त माहिती मिळाली. डीबी प्रमुख गोपाल जाधव यांनी आपल्या टीमसाहित घटनास्थळी रवाना झाले. दुपारी 1 वाजताच्या सुमारास हमिद चौकाजवळ सोसायटीच्या कंट्रोल समोर दोन टाटा एस वाहन रेतीने भरलेले होते. ते त्याच ठिकाणी खाली होताना दिसून आले. त्यांनी त्वरित कारवाई करीत नायब तहसीलदार व्ही व्ही पवार यांना याबाबत महिती दिली.

घटनास्थळी येऊन ना. तहसीलदार यांनी पुढील कारवाई करीत टाटा एस वाहन क्रमांक (MH 34 M 6833) ज्याचा वाहन चालक दानिश शकिर शेख (25) व सोनू रंगरेज दोघेही रा. एकतानागर व दुसरे वाहन क्रमांक (MH 27 X 6421) चा वाहन चालक एजाज रंगरेज रा. काजीपुरा वणी यांच्यावर कारवाई करीत वाहन जप्त करून अवैधरीत्या रेती वाहणाऱ्या तीघांना अटक केली आहे.

व्ही व्ही पवार नायब तहसीलदार यांना विचारणा केली असता त्यांनी पुढील करवाईकरिता तहसीलदार श्याम धनमने यांच्याकडे अहवाल पाठविले असल्याची माहिती दिली. सदर कारवाई डीबी पथकाचे प्रमुख गोपाल जाधव यांच्यासह सुनील खंडागळे, सुधीर पांडे, दीपक वांड्रसवार, पंकज उंबरकर, यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.