सुशील ओझा, झरी: तालुक्यातील खडकी येथील गट नं ३७/२ मध्ये खानपट्टीतुन अवैध वाहतूक करणाऱ्या ओमसाई ट्रान्स्पोर्टचे तीन ट्रक तहसीलदार व नायब तहसीलदार यांनी पकडून पावणे ७ लाखाचे दंड ठोठावला आहे. रुईकोट ते बोरी मुख्य मार्गाचे रुंदिकरणाचे काम सुरू आहे. याकरिता तहसील कार्यालयातून रेती वाहतूक करण्याकरिता परवानगी घेण्यात आली होती. परंतु परवानगीची मुद्दत संपल्यानंतरही ट्रकद्वारे मुरूमाची अवैध वाहतूक सुरू होती.
याबाबत तहसीलदार यांना माहिती मिळाली. त्यावरून रुईकोट बसस्थानकाजवळ तहसीलदार गिरीश जोशी व नायब तहसीलदार रामचंद्र खिरेकर यांनी तिन्ही ट्रकची तपासणी केली. त्यात त्या ट्रकला परवानगी नसल्याचे आढळले. तिनही ट्रक मुकुटबन पोलीस स्टेशनला लावण्यात आलेत. प्रत्येकी ट्रक २ लाख २० हजार ७५० प्रमाणे तिन्ही ट्रकवर एकूण ६ लाख ६२ हजार २५० रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
खडकी येथे शिवगणेश नामक व्यक्तीच्या ओमसाई ट्रान्सपोर्ट बल्लारशहा याला २०० ब्रासची २८ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबरपर्यंत मुरूम काढण्याची परवानगी देण्यात आली. चंद्रपूर येथील राजू नामक व्यक्तीलासुद्धा परवानगी देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. खानपट्ट्यातून मुरूम उत्खनन करण्याच्या परवानगीपेक्षा जास्त प्रमाणात मुरूमचे उत्खनन केले जात आहे.
२०० ब्रासची परवानगी असताना हजार ब्रास उत्खनन करून वाहतूक केली जात आहे. दररोज ५ ते ६ ट्रकने मुरूमची वाहतूक करून एकाच दिवशी १५० ते २०० ब्रास मुरूम वाहतूक केली जात आहे. याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत आहे. परंतु तहसीलदार यांनी तीन ट्रक मुरूमचे पकडताच भिंग फुटले.
महसूल विभागाकडून मुरूम वाहतूक परवानगी घेताना कोणत्या ट्रक किंवा ट्रॅक्टरद्वारे वाहतूक केली जाते याचा नंबरसुद्धा उल्लेख केला जातो. परंतु इतर वाहनांनीसुद्धा मुरूमची वाहतूक केली जात असल्याची माहिती आहे.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)