ब्रेकिंग न्यूज- वाघ झाला नरभक्षी, शेतक-याचा पाडला फडशा…

कोलेरा परिसरात एका आठवड्यात वाघाचा मानवावर दुसरा हल्ला.... वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील कोलेरा (पिंपरी) येथील एका शेतक-याला वाघाने हल्ला करून ठार केले. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. रामदास जगन पिदूरकर (अंदाजे 65) असे वाघाच्या हल्ल्यात मृत शेतक-याचे नाव आहे. हा हल्ला इतका भीषण होता की वाघाने मृताच्या शरीराची चाळणी केली. गेल्या आठवड्यातच या परिसरात असणा-या एका मजुरावर वाघाने हल्ला केला होता. मात्र सुदैवाने त्याने अंगावर घोंगडी पांघरून असल्याने त्याचा जीव वाचला होता. त्यानंतर हा वाघाचा दुसरा हल्ला आहे. आता वाघ नरभक्षी झाल्याने संपूर्ण परिसर दहशतीत आला आहे. 

सविस्तर वृत्त असे की रामदास पिदूरकर हे कोलेरा गावातील रहिवासी होते. ते शेती करायचे. रविवारी दिनांक 27 नोव्हेंबर रोजी ते गुरांना चरण्यासाठी शेतात घेऊन गेले होते. संध्याकाळी सर्व जनावरे परत आले. मात्र त्यांच्यासोबत रामदास हे परत आले नाही. त्यामुळे गावातील लोकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. जवळपास लोकांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र भीतीपोटी व अंधार झाल्याने त्यांनी सकाळी शोध मोहीम सुरू करण्याचे ठरवले.

भल्या सकाळी गावातील काही लोक शोध घेण्यासाठी गावाहून निघाले असता. कोलेरा गावापासून हाकेच्या अंतरावर (अंदाजे 200 मीटर) रामदास हे वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याचे आढळून आले. त्यांचे अर्धे शरीर वाघाने खाल्ले असून अर्ध्या बाजूचा केवळ सांगाडा शिल्लक आहे. वनविभाग व पोलीस विभागाला याची माहिती देण्यात आली. ही वार्ता पसरताच घटनास्थळावर परिसरातील गावक-यांनी एकच गर्दी केली. वनविभागाचे कर्मचारी ही घटनास्थळी दाखल झाले आहे. 

Comments are closed.